अज्ञात वाहनाने घेतला बाप-लेकाचा जीव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

खापा येथील रहिवासी शुभम हा बुधवारी वडिलांना सावनेर येथून घरी परत घेऊन येत होता. मात्र, वाटेत काळाच्या रूपात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला.

खापा (जि. नागपूर) : खापा येथील रहिवासी असलेले मुलगा व वडील कामानिमित्त सावनेर गेले होते. मुलगा गाडी चालवत होता तर वडील मागे बसले होते. काम आटोपल्यानंतर दोघेही परतीच्या प्रवासासाठी निघाले. मात्र, काळाला काही वेगळचे मान्य होते. सावनेर मार्गावरील आरामशीन वळणमार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा नंतर मरण पावला. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास मुलगा शुभम (वय 22) हा वडील केशव धनराज गोड्डे (वय 55, रा. नवीन वस्ती खापा) यांना सावनेरहून घरी घेऊन येत होता. सावनेर मार्गावरील आरामशीनजवळील वळणावर सामोरून येणाऱ्या जड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात केशव यांचा जागीच मृत्यू झाला तर शुभम गंभीर जखमी झाला. अपघात घडल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. नागरिकांनीच पोलिसांना माहिती दिली. 

 

ही बातमी अवश्य वाचा - कर्ज फेडणार कसे? आत्महत्याच करतो ना...

 

खापा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच लगेच घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जखमी शुभम गोड्डेला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. मात्र, प्राथमिक केंद्रात पोहोचण्यापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या घटनेमुळे खापा येथील नवीन वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पुढील तपास खापाचे ठाणेदार एकरे यांच्या मार्गदर्शनात झांबरे, मुकुंद लोंढे करीत आहे.

 

जाणून घ्या - डॉन संतोष आंबेकरचा आणखी एक कारनामा

 

वाहनाची माहिती नाही

अपघात झाला त्यावेळी परिसरात कुणीही नसल्याने धडक देणारे वाहन कोणते होते, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, धडक देणारे अवजड वाहन असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

No photo description available.
याच दुचाकीने बापलेक खाप्याकडे येत होते.

 

वाळूची वाहतूक जीवघेणी

कन्हान नदीतून वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागपूर व सावनेर मार्गाने मोठ्या प्रमाणात शेकडो ओव्हरलोड वाळूचे ट्रक भरधाव धावत असतात. या ट्रकमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. याशिवाय ही वाळू चोरीची असल्याने लवकरात लवकर पळण्यासाठी ट्रकचालक वेगाने वाहन चालवितात. यामुळे या घटनेतील धडक देणारे वाहन वाळूचे असावे, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Father and son dead in accident