हम है नये... अंदाज क्‍युं हो पुराना !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - "कट्यार' असो की "कजरारे' आज (रविवार) नागपुरात एकच चर्चा होती... ती म्हणजे "शंकर महादेवन' ! तुडुंब भरलेल्या यशवंत स्टेडियममध्ये नागपूरकरांना थिरकविण्याची किमया शंकर महादेवन यांनी केली. "हम है नये...अंदाज क्‍युं हो पुराना' असे म्हणत एखाद्या सार्वजनिक उत्सवाप्रमाणे नागपूरकरांनी आजचा दिवस साजरा केला.

नागपूर - "कट्यार' असो की "कजरारे' आज (रविवार) नागपुरात एकच चर्चा होती... ती म्हणजे "शंकर महादेवन' ! तुडुंब भरलेल्या यशवंत स्टेडियममध्ये नागपूरकरांना थिरकविण्याची किमया शंकर महादेवन यांनी केली. "हम है नये...अंदाज क्‍युं हो पुराना' असे म्हणत एखाद्या सार्वजनिक उत्सवाप्रमाणे नागपूरकरांनी आजचा दिवस साजरा केला.

अशा कार्यक्रमांमध्ये मुख्य गायक सुरुवातीचे पाऊण तास रसिकांची उत्सुकता ताणून धरतो. पण, शंकर महादेवनने पहिल्याच गाण्याला स्टेजवर एन्ट्री घेतली आणि एकच जल्लोष झाला. विशेष म्हणजे "सूर निरागस हो' हे लोकप्रिय मराठी गीत त्यांनी सुरुवातीलाच गायले आणि याच गाण्यातील पहिल्या आलापाला टाळ्यांचा कडकडाट झाला. संगीतकार म्हणून वीस वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. "दिल चाहता है' या गाण्याच्या वेळी त्यांच्यासोबत नागपूरकर गायिका श्रीनिधी घटाटे हिचीही एन्ट्री झाली आणि पुढे "कजरारे'पर्यंत तिने चांगलाच माहोल केला. पुढे "रॉक ऑन', "प्रेटी वुमन', "घेई छंद मकरंद', "तेरे नैना', "कोई कहे कहता रहे', "कल हो ना हो', "तारें जमीं पर' आदी गाणी त्यांनी गायली. "मन उधाण वाऱ्याचे', "माझे माहेर पंढरी' यासारख्या गाण्यांमधून अस्सल मराठी रसिकांनाही रिझवले. विशेष म्हणजे प्रत्येक गाण्याला नागपूरकरांचा प्रतिसाद बघून शंकर महादेवन स्वतःच नागपूरकरांचे कौतुक करताना थकत नव्हते. हा आपल्यासाठी भावनिक अनुभव असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला जवळपास दोन तास केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची सहपरिवार उपस्थिती होती. गर्दीचा उत्साह बघून, थिरकणारी तरुणाई बघून शंकर महादेवन यांनी "नितीनजी देखीये नागपूर' असे म्हणत मागे बघण्याचे आवाहन केले.

श्रीनिधी घटाटेचे कौतुक
नागपूरची गायिका श्रीनिधी घटाटे सध्या शंकर महादेवन यांच्या ग्रुपसोबत जगभरात कार्यक्रम करते. आज त्यांच्यासोबत ती पहिल्यांदाच नागपुरातही गायली. तिच्याविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी एका मित्राने श्रीनिधीला माझ्याकडे पाठविले होते. तिने संवादिनीची साथ नसतानाही एक कठीण गझल अतिशय उत्कृष्टरीत्या गाऊन दाखवली आणि तेव्हाच तिच्यातील टॅलेंट मला कळले. त्या दिवसापासून आजपर्यंत श्रीनिधी माझ्या ग्रुपची मुख्य गायिका आहे. ती नागपूरची आहे, याचा मला विशेष अभिमान आहे.' श्रीनिधीची ओळख करून दिल्यावर यशवंत स्टेडियमवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

आज समारोप
नागपूर महोत्सवाचा उद्या (सोमवार) अखेरचा दिवस असून बॉलीवूड स्टार फरहान अख्तर याच्या परफॉर्मन्सची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे. सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.

Web Title: Nagpur Festival