राज्यातील पहिले "स्मार्ट पोलिस ठाणे' कुठे आहे रे भौ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

  • पोलिस ठाण्यात तयार होणार वीज 
  • सौरउर्जा निर्माण करणारे यंत्र 
  • 144 कोटी 96 लाखांचा निधी मंजूर 
  • 26 हजार 800 चौमी क्षेत्रफळात बांधकाम 

नागपूर : पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस अधिकारी, गुन्हेगार, आरोपी, केस डायरी किंवा फिर्यादी यांचा कलकलाट नेहमीचाच आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातून काहीतरी निर्मिती होईल यावर कुणाचाच विश्‍वास बसणार नाही. परंतु, राज्यातील पहिले "स्मार्ट पोलिस ठाणे' सज्ज झाले असून, या पोलिस ठाण्यातून चक्‍क वीज निर्मिती होणार आहे. वाचून नवल नाही वाटले तरच नवल. हो हे सत्य आहे. स्मार्ट पोलिस ठाण्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या चार मजली भव्यदिव्य लकडगंज पोलिस ठाण्याच्या छतावर मोठमोठे सौरउर्जा निर्माण करणारे यंत्र लावले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात येणार आहे. 

Image may contain: 6 people, people standing
स्मार्ट पोलिस ठाण्याची पाहणी करताना पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्‍त आयुक्‍त नीलेश भरणे आणि अधिकारी. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2014 मध्ये राज्यात स्मार्ट पोलिस ठाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून नागपुरातील लकडगंज पोलिस ठाण्याची निवड करण्यात आली. लकडगंज पोलिस ठाणे आणि गृहनिर्माण प्रकल्प नावाने बांधकामास सुरुवात झाली होती. 144 कोटी 96 लाख रुपयांचा निधी या प्रोजेक्‍टसाठी मंजूर करण्यात आला होता. चोवीस महिन्यांच्या कालावधीत 26 हजार 800 चौमी क्षेत्रफळात या भव्य स्मार्ट पोलिस ठाण्याचे बांधकाम पूर्ण होत आहे. सध्या लकडगंज पोलिस ठाणा उद्‌घाटनासाठी सज्ज झाले असून, येत्या काहीच दिवसांत नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

पोलिस आयुक्‍तांनी दिली भेट

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नव्या इमारतीतील भव्य लकडगंज पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर, महावारकर, लकडगंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी पोलिस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली. तसेच इमारतीमधी सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. 

पोलिस ठाण्याचे वैशिष्ठ

लकडगंज स्मार्ट पोलिस ठाण्याच्या इमारतीत पोलिस उपायुक्‍त कार्यालय तसेच सहायक पोलिस आयुक्‍त कार्यालये थाटण्यात येणार आहे. एकाच छताखाली पोलिस अधिकारी तक्रारदार किंवा नागरिकांना भेटतील. लगतच पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 12 मजली असलेल्या चार इमारती बांधण्यात आल्या आहेत. व्यावसायिक संकुलासह क्‍लब व जिम्नॅशियमचीही निर्मिती करण्यात आली आहे. 

Image may contain: sky, cloud, skyscraper and outdoor

सौरऊर्जा आणि मलजलप्रक्रिया

लकडगंज पोलिस ठाण्यामध्ये आदर्शवत असलेला सौरऊर्जा प्रकल्प लावण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातून 65 किलोवॅट क्षमतेची विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच मलजल प्रक्रिया केंद्राचीही निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या सर्वच इमारतींमध्ये अद्यावत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. 

Image may contain: 1 person
डॉ. भूषणकुमार उपाध्याय

सर्वच सुविधा उपलब्ध 
लकडगंज पोलिस ठाणा राज्यातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणा म्हणून सज्ज असून, लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. या ठाण्यात सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांतच पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन करण्यात येईल. पोलिस ठाण्याची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, 
पोलिस आयुक्‍त.

Image may contain: 1 person, smiling, closeup
नरेंद्र हिवरे

आम्हालाही उद्‌घाटनाची उत्सुकता 
पहिल्या स्मार्ट पोलिस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलिस निरीक्षक होण्याचा मान मिळाल्यामुळे निश्‍चितच आनंद होत आहे. आम्हालाही उद्‌घाटनाची उत्सुकता आहे. प्रत्येक नागरिकाला आपलेसे वाटेल असे आदर्शवत पोलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 
- नरेंद्र हिवरे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : The first smart police station in the state