लंडनमध्ये गजानन विजय ग्रंथाचे इंग्रजीत पारायण

नितीन नायगांवकर
बुधवार, 6 जून 2018

नागपूर : शेगावच्या गजानन महाराजांचे चरित्र कथन करणारा दासगणू महाराज रचित विजय ग्रंथ यापूर्वीच ग्लोबल झाला आहे. पण, आता इंग्रजीतील पारायणाच्या माध्यमातून तो इंग्लंडवारीसाठी सज्ज झाला आहे. नागपुरातील सुनील भागवत यांच्या पुढाकाराने ही वारी होणार असून, यात महाराष्ट्रातील 21 लोकांचा समावेश असेल.

नागपूर : शेगावच्या गजानन महाराजांचे चरित्र कथन करणारा दासगणू महाराज रचित विजय ग्रंथ यापूर्वीच ग्लोबल झाला आहे. पण, आता इंग्रजीतील पारायणाच्या माध्यमातून तो इंग्लंडवारीसाठी सज्ज झाला आहे. नागपुरातील सुनील भागवत यांच्या पुढाकाराने ही वारी होणार असून, यात महाराष्ट्रातील 21 लोकांचा समावेश असेल.
विदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये आपल्या परंपरा, सणंवार, अध्यात्माबद्दल असलेली ओढ कुणालाही नवीन नाही. जवळपास सर्वच भारतीय उत्सव आज जगाच्या कानाकोपऱ्यांत साजरे होतात. भारतातील आध्यात्मिक ग्रंथांचे वाचनही अनेक देशांमध्ये होत असते. 1980 मध्ये जी. एन. नाईक यांनी गजानन विजय ग्रंथाचा इंग्रजीत केलेला अनुवाद न्यूयॉर्कनिवासी शंकर पंडित यांनी ओवीबद्ध स्वरूपात उपलब्ध करून दिले. मात्र, त्याचा प्रचार-प्रसार पारायणाशिवाय शक्‍य नाही, असा विचार मनात आल्यानंतर नागपुरातील सुनील भागवत यांनी लंडनवारीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यात नागपूरसह मुंबई, पुणे, अकोला, भुसावळ आदी शहरांमधील 21 लोकांची साथ मिळाली आणि 14 ते 19 जून या कालावधीत लंडनवारी निश्‍चित झाली. "व्हिजिट टू लंडन विथ गजानन महाराज' असे या दौऱ्याला नाव देण्यात आले आहे. ईस्ट लंडनमधील इबिस हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये 16 जूनला 21 लोक 21 अध्यायांचे वाचन करणार आहे. यापूर्वी अशापद्धतीचे पारायण झाल्याचे ऐकिवात नाही, असे सुनील भागवत यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे लंडनमधील भारतीयांसाठी 51 पोथ्या नागपुरातून जाणार आहेत. पुढे याच समूहातील चार लोक अमेरिकेत जाऊन अशाचपद्धतीने गजानन विजय ग्रंथाचे इंग्रजीत पारायण करणार आहेत.
विमान प्रवासातही वाचन
नागपूर ते लंडन या साडेनऊ तासांच्या विमान प्रवासात गजानन विजय ग्रंथाचे वाचन होणार आहे. लंडनमध्ये ज्या उपक्रमासाठी जात आहोत, त्याची वातावरणनिर्मिती प्रवासातूनच करण्याचा प्रयत्न आहे, असे श्री. भागवत यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Nagpur gajanan vijay grantha news