नागपूरचा कचरा जाणार रायपूरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

कचऱ्यातूनही मिळणार पैसे
नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम सांडपाणी विक्रीची कल्पना मांडली होती. तेव्हा सर्वांनी ती  हसण्यावर उडवून लावली होती. कोराडी पॉवर प्लान्टने प्रक्रिया केलेले सांडपाणी विकत घेतले आहे. त्यातून मनपाला वर्षाला ८० कोटींचे उत्पन्न प्राप्त होत आहे. डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या विक्रीतूनही महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय कचऱ्याची डोकेदुखी दूर होणार आहे.

नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार आहे. 

एस. एल. ग्रुपने रायपूर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. यासाठी नागपूरचा कचरा वापरला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा करार झाला आहे. त्यानुसार एक जूनपासून नागपूरच्या कचऱ्याची निर्यात सुरू होणार आहे. त्यामुळे पूर्व नागपुरातील विशेषतः डम्पिंग यार्डच्या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. 

डम्पिंग यार्डची साठवणूक क्षमता केव्हाच संपली आहे. शहारातून दररोज तब्बल बाराशे टन कचऱ्याची उचल होते. तो भांडेवाडीत नेऊन टाकला जातो. त्यामुळे येथे मोठा कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. यार्डच्या शेजारी राहणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. 

याविरोधात अनेकदा आंदोलन झाले. नवा डम्पिंग यार्ड तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, जागेची अडचण आहे. याशिवाय डम्पिंग यार्डचा विषय निघताच लगेच विरोधाला सुरुवात होते. मेट्रो रिजनमध्ये डम्पिंग यार्डसाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र, ती जागा लांब असल्याने रोजच्या वाहनाचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे महापालिकेला नाइलाजाने भांडेवाडीतच कचरा टाकावा लागत होता. रायपूरमध्ये येथील कचरा नेला जाणार असल्याने महापालिकेची मोठी अडचण दूर होणार आहे.

मनपाचे बायोमायनिंग
महापालिकेने भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंगसुद्धा सुरू केले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण तसेच रासायनिक प्रक्रिया करून कचरा नष्ट केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Garbage go to Raipur Nitin Gadkari