नागपूरने केले देशाचे नेतृत्व!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे मुख्यालय गेल्या २८ वर्षांपासून नागपुरात आहे. केंद्र सरकारच्या सात सांस्कृतिक केंद्रांपैकी एक असलेल्या या केंद्राकडे कायम ‘शासकीय’ कार्यालयाच्या नजरेतूनच बघण्यात आले. मात्र, अधिकारी सक्षम असेल तर शासकीय योजनांचाही मूळ उद्देश साध्य होऊ शकतो, याचा आदर्श केंद्राने उभा केला. गेल्या सहा वर्षांमध्ये झालेला लोकाभिमुख बदल आणि २०१६ मध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवरील आयोजनामध्ये केंद्राने केलेले सांस्कृतिक नेतृत्व, याची प्रचिती देते.

ऑक्‍टोबर १९८६ मध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र आणि कर्नाटक या राज्यांमधील लोकसंस्कृतीचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याची जबाबदारी सोपवून या केंद्राची स्थापना झाली. दरम्यानच्या काळात छत्तीसगडचा समावेश केंद्रात झाला. आदिवासी लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग केंद्राशी जुळला. जबाबदारी वाढली, उपक्रमही वाढले. मात्र, काही वर्षांनी ‘ग्राफ’ खाली आला. गैरव्यवहारानेही पोखरले. अशात रवींद्रकुमार सिंगल नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याने संचालक म्हणून केलेली कामगिरी लोकांचे लक्ष वेधू लागली. खऱ्या अर्थाने केंद्र लोकाभिमुख झाले. तीन वर्षांपूर्वी डॉ. पीयूष कुमार यांनी जबाबदारी सांभाळली आणि सुदैवाने  तिच मालिका कायम ठेवली. पीयूष कुमार यांनी केंद्राला काही प्रमाणात व्यावसायिक अंग दिले. एवढेच नव्हे, तर केंद्राच्या कक्षा विस्तारत तेलंगण आणि गोव्याला सामावून घेतले. आता नागपुरातून तब्बल सात राज्यांच्या लोकसंस्कृतीचे नेतृत्व दक्षिण मध्य करीत आहे. 

 २०१६ हे केंद्रासाठी सर्वोत्तम ठरले. विशाखापट्टणम येथील भारतीय नौसेचा ‘आंतरराष्ट्रीय फ्लिट रिव्ह्यू’, उज्जैन येथील सिंहस्थ कुंभ मेळा, मुंबईतील ‘मेक इन इंडिया’, वाराणसी व दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृती महोत्सव या आयोजनांमध्ये दक्षिण मध्य केंद्राच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. देशभरातील लोककलावंत निवडणे, त्यांची तालीम करून घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर उतरविणे या एकूणच प्रक्रियेची मुख्य जबाबदारी केंद्राने सांभाळली. नागपूरच्या केंद्राने पीयूष कुमार यांच्या नेतृत्वात मिळविलेली विश्‍वासार्हता याला कारणीभूत ठरली. डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन संचालक रवींद्र सिंगल यांनी सांस्कृतिक केंद्रांचा रौप्यमहोत्सव नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर आयोजित केला होता. रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे नेतृत्व करण्याची तेव्हा मिळालेली संधी, केंद्राच्या राष्ट्रीय भरारीची नांदी होती, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Nagpur has led the country