सुरक्षा कवच...28 जिल्ह्यांतील कारागृहात 126 होमगार्ड तैनात होणार

राजेश रामपूरकर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असल्याने अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक पुणे यांनी होमगार्डची मागणी सरकारकडे केली होती.

नागपूर : कारागृह रक्षक, शिपाईची पदे रिक्त असल्याने ती उपलब्ध होईपर्यंत राज्यातील 28 जिल्ह्यांमधील कारागृहात 300 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. कारागृहाच्या सुरक्षेसाठी पहिल्या टप्पात 126 होमगार्डच्या तैनातीला मान्यता दिली आहे. बुधवारपासूनच (ता.4) त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

राज्यातील सर्वच कारागृहामध्ये कारागृह रक्षक, शिपाईची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असल्याने अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक पुणे यांनी होमगार्डची मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने होमगार्ड महासमादेशक कार्यालयाला होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. होमगार्ड महासमादेशक कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वा. ते. धकाते यांनी पत्र काढून 300 होमगार्डच्या कारागृहातील तैनातीला मंजुरी दिली आहे. 125 पुरुष आणि एक महिला होमगार्ड अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक पुणे यांना उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. होमगार्डला उद्या बुधवारपासून (ता.4) सेवेत रुजू होण्याचे निर्देशही दिलेले आहेत. 

होमगार्डचे चार विभाग करण्यात असून मध्य विभागातील धुळे, लातूर, बीड, औरंगाबाद, नंदूरबार, पैठण, नाशीक आणि जळगाव या सर्व जिल्ह्यात 47 होमगार्डची नियुक्ती केली आहे. पूर्व विभागात नागपूर, गडचिरोली. चंद्रपूर जिल्ह्यात 18, पश्‍चिम विभागातील येरवडा कारागृह, कोल्हापूर कारागृह व सांगलीमध्ये 25, दक्षिण विभागातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह, सावंतवाडी जिल्हा कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, अलिबाग जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृहात 35 होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. या सर्वच होमगार्डच्या नियुक्तीचा कालावधी 4 डिसेंबर ते तीन मार्च 2020 पर्यंत असून ती तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 4 डिसेंबर 2019 ते 3 जानेवारी 2020, 4 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2020, तिसरा टप्पा 4 फेब्रुवारी ते 3 मार्च 2020 असा आहे. होमगार्डला कर्तव्यावर तैनात करण्यासाठी जिल्हानिहाय होमगार्डच्या याद्या ऑनलाइन लावण्यात येणार आहेत. 

चांगला निर्णय
मानधन तत्त्वावर अथवा पगारावर काम करणाऱ्या होमगार्डसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे "अच्छे दिन'आले आहे. राज्य सरकारने होमगार्डवरील खर्च कमी केला आहे. त्यांचे सराव सत्रही कमी केले आहेत. सरकारच्या बचतीच्या धोरणामुळे त्यांच्यावर संक्रांत आली आहे. नवरात्र, गणेशोत्सव आदींवरच होमगार्डसची भिस्त आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, homeguard, jail, security