तोतया ब्रिटिश नागरिकांनी नागपूरच्या गुंतवणूक सल्लागाराला घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

-ब्रिटिश नागरिक असल्याची बतावणी

-वारंवार फोन करून विश्‍वास संपादन केला

 

 

नागपूर : भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची इच्छा दर्शवीत तोतया ब्रिटिश नागरिकांनी नागपूरच्या गुंतवणूक सल्लागाराची सुमारे अडीच लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संजय गुनघे (56, रा. गुरुछाया सोसायटी, न्यू मनीषनगर) हे सिक्‍युरिटी एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसबी)अंतर्गत म्युच्युअल फंड ऑफ इंडियाचे अधिकृत परवानाधारक आहेत. 18 ते 20 वर्षांपासून ते गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यवसाय करीत आहेत. फेसबुक, इन्स्ट्राग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे गुंतवणूकदारांना आमंत्रित करतात. सप्टेंबर महिन्यात त्यांचे प्रोफाइल बघून हावर्ड आर्टियाना असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मोबाईलवरून त्यांच्यासोबत संपर्क साधला. ब्रिटिश नागरिक असल्याची बतावणी करीत भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची इच्छा दर्शविली. त्यानंतर एका महिलेने त्यांना फोन केला. एयरपोर्ट ऍथॉरिटीची महिला कर्मचारी असल्याची बतावणी केली. हावर्ड आर्टियाना तीन महिन्यांसाठी भारतात येत असल्याची माहिती दिली. सोबतच वास्तव्याच्या काळात सुमारे 1 लाख 80 हजार भारतीय चलनाची गरज भासणार असल्याचे सांगून मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर वारंवार फोन करून विश्‍वास संपादन केला. गुनघे यांनी विश्‍वास ठेवून 9 ऑक्‍टोबर रोजी 65 हजार आणि 1 लाख 80 हजार असे एकूण 2 लाख 45 हजार आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानंतर आरोपींनी पुन्हा गुनघे यांना फोन करून इन्शुरन्स क्‍लीअरन्स सर्टिफिकेटसाठी 3 लाख 80 हजारांची गरज असल्याचे सांगितले. संशय आल्याने गुनघे यांनी रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी वारंवार संपर्क साधला; मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बेलतरोडी ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, investment advisor, bogass british citizen, loot