मॉलसाठी महामेट्रोला अडीच टक्के कमिशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : वर्धा मार्ग ते जयताळापर्यंत ऑरेंज सिटी स्ट्रिटवर महामेट्रो मेट्रो मॉल तयार करणार असून, यासाठी महापालिकेकडून अडीच टक्के कमिशन घेणार आहे. आचारसंहितेपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी नमूद केले.

ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प 30.49 हेक्‍टरमध्ये तयार होत आहे. प्रकल्पात महामेट्रो जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मॉल तयार करणार आहे. याबाबत गुरुवारी मनपा आयुक्त व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात करारही झाला. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प टप्प्याटप्प्याने तयार करण्यात येणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल, निवासी संकुल आदी तयार करण्यात येणार आहे.
शुक्रवारी स्थायी समितीपुढे ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पासाठी ट्रान्झॅक्‍शन ऍडव्हायजरच्या नियुक्तीच्या सुरू असलेल्या प्रक्रियेला निरस्त करण्याचा प्रस्ताव प्रकल्प विभागाने मांडला होता. आता हा प्रकल्प महापालिका तयार करणार आहे. त्यासाठी सेल्स मॅनेजमेंट एजन्सीची नियुक्ती करणे योग्य ठरेल, असे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सेल्स मॅनेजमेंट एजन्सी नियुक्तीचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी स्थायी समितीने ट्रान्झॅक्‍शन ऍडव्हाजरच्या नियुक्तीचा जुना ठराव निरस्त केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले. सेल्स मॅनेजमेंट एजन्सीच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Web Title: Nagpur mahametro news