नागपूर शहराचा नवा महापौर कोण होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

शहरातील पक्षाचे निर्णय प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेच घेतात. इच्छुकांपैकी कोणाला यांची पसंती मिळते यावरच सारे काही अवलंबून राहणार आहे. 

नागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि संजय बंगाले यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, महापौराचे नाव निश्‍चित कोण करणार यावरच सारेकाही अवलंबून असल्याने सर्वांनी सबुरीचा मार्ग स्वीकारला आहे. 

महापौरपदाच्या आरक्षणाची आज सोडत जाहीर करण्यात आली. नागपूर महापौरासाठी खुल्या प्रवर्गाची चिठ्‌ठी निघाल्याने सर्वांनाच दावा ठोठावता येणार आहे. महापालिकेत सर्वाधिक 108 नगरसेवक असल्याने भाजपचाच महापौर होणारे हे निश्‍चितच आहे. संदीप जोशी अनेक वर्षांपासून इच्छुक आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी महापालिका चांगलीच गाजविली होती. त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. त्यांनी आपली कार्यक्षमताही सिद्ध केली. सध्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक समोर नसल्याने यंदा जातीय समीकरणाचा फारसा विचार केला जाणार नाही असे दिसते. दयाशंकर तिवारी हेसुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. पालिकेच्या कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. सत्तापक्षनेतेही म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. धरमपेठ परिसराचे नगरसेवक संजय बंगाले यांच्याही नावावर चर्चा होऊ शकते. ते सध्या विषय समितीचे सभापती आहेत. मुख्यमंत्र्यांचे पाठबळही त्यांच्यासोबत आहे. खुल्या प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने स्थायी समिती व परिवहन समितीचे माजी सभापती बाल्या बोरकर हेसुद्धा इच्छुक आहेत. दहा वर्षांच्या कार्यकाळात माया इवनाते, अर्चना डेहनकर आणि नंदा जिचकार अशा तीन महिला महापौर झाल्या. त्यामुळे यावेळी महिलांना संधी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याची चर्चा आहे. 

दोनच वर्षांचा कार्यकाळ मिळणार 
महापौर नंदा जिचकार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे नव्या महापौरास दोनच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

मनपातील संख्याबळ 
भाजप ः 108 
कॉंग्रेस ः 29 
बसप ः 10 
शिवसेना ः 02 
राष्ट्रवादी ः 01 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, mayor