महापौर म्हणाले, "ब्ल्यू प्रिंट' तयार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • मावळत्या महापौरांकडून स्वीकारली सूत्रे
  • विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणार 
  • शहराच्या कायापालटासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

नागपूर : महापौरपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच पुढील सव्वा वर्षाच्या कार्यकाळात करण्यात येणाऱ्या विकासकामांची ब्ल्यू-प्रिंट तयार आहे. विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणार आहोत. शहराचा कायापालट करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. एकट्या यंत्रणेने ते शक्‍य नाही. म्हणूनच "वॉक ऍण्ड टॉक विथ मेयर', "सजेशन बॉक्‍स' आदी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या सूचना मागवित असून, यातून शहराचा कायापालट करण्याचा संकल्प करीत असल्याचे शनिवारी नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. 

सिव्हिल लाइन्स येथील महानगरपालिकेत त्यांनी पदग्रहण केले. मावळत्या महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, उपनेत्या वर्षा ठाकरे, मावळते उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते. 

महापौर झाल्यानंतर सत्कार, हारतुरे न स्वीकारता तोच खर्च महापौर साहाय्यता निधीत द्यावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद मिळायला लागला. हा निधी शहरातील गरजूंच्या कामात यावा, अशी यामागील भूमिका आहे. वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत असून, त्यातून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचेही निरासन करण्यात येईल, असे जोशी यांनी नमूद केले. पदग्रहण समारंभात सर्व विषय समित्यांचे सभापती, झोन सभापती, सर्वपक्षीय नगरसेवक, भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्‍न जटील

फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्‍न जटील आहे. यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढणे आवश्‍यक आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली राकॉं पक्षनेते दुनेश्वर पेठे, बसप गटनेत्या वैशाली नारनवरे, अपक्ष नगरसेविका आभा पांडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, राजू भिवगडे, महेश धामेचा अशी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आल्याचेही जोशी म्हणाले. 

कोठे, जाधव यांचेही पदग्रहण

यावेळी उपमहापौर मनीषा कोठे आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचेही पदग्रहण झाले. उपमहापौर कार्यालयात मावळते उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी नवनिर्वाचित उपमहापौर मनीषा कोठे यांना कार्यभार सोपविला. जाधव यांनी जोशींकडून सूत्रे स्वीकारली. 

Image may contain: 1 person, closeup

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने निधीचा ओघ
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने शहराच्या विकासात आता बाधा येणार नाही. निधीची कमतरता भासणार नाही. लोकसहभागातून या शहराचा विकास करण्याचा संकल्प यानिमित्ताने करीत आहे. 
- संदीप जोशी, महापौर

Image may contain: 1 person, smiling

शहर वेगळ्या उंचीवर जाईल 
महापौर संदीप जोशी यांच्या कार्यकाळात शहर एका वेगळ्या उंचीवर जाईल. 
- नंदा जिचकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur mayor said, Blue print 'ready