आरोपीवर वर्षभरापासून पेइंग वॉर्डात उपचार

file photo
file photo

नागपूर, ता. 24 ः कोट्यवधीचा गैरव्यवहार केलेल्या गुन्हेगाराला वर्षभरापासून "पेइंग वॉर्डा'त व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे. धक्कादायक बाब अशी की त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा रुग्ण असून त्याला मेडिकल प्रशासनातर्फे अभय देण्यात येत आहे. सामान्य रुग्णांची हेळसांड करणाऱ्या मेडिकलमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यातील रुग्णाला मात्र वर्षभरापासून मेडिकलचा पेइंग वॉर्ड खुला करून दिला आहे, हे नियमाला धरून आहे का? असा सवाल पुढे आला आहे. ज्याचे नाही कोणी त्याचे मेडिकलही नाही, अशी दयनीय परिस्थिती मेडिकलमध्ये आहे. गरिबांना खाट मिळत नाही. गादी मिळत नाही, यामुळे स्वतःची गादी घेऊन बिचारे गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेतात. अनेक घटनांमध्ये निवासी डॉक्‍टर गरिबांची उपचारादरम्यान हेळसांड करतात, उपराजधानीतील जरीपटका परिसरात झालेल्या कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात 2015 मध्ये 10 ऑक्‍टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गांधी सेंटिनिअल स्कूलचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष दीपक बजाज यांना ताब्यात घेतले होते. बजाज यांच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. लाचलुचपत कायद्याच्या कलम 13 (1) (सी), कलम 13 (2 ) आणि भांदविच्या कलम 467 ,486 ,471 , 420 आणि 12 "ब' अन्वयेदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली कोट्यवधी रुपये जमा करीत संस्थेत गैरप्रकार केल्याचा आरोप बजाज यांच्यावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर बजाज यांनी आक्षेप घेतला आहे. आरोपी असलेले बजाज गेल्या वर्षभरापासून नागपूरच्या मेडिकलमधील "पेइंग वॉर्डात' वातानुकूलित हवेत उपचार घेत आहेत. मध्ये दोन दिवस कधीतरी सुटी देऊन पुन्हा त्याला याच पेइंगमध्ये भरती करण्यात येते. आश्‍चर्याची बाब म्हणजे बजाज यांना केवळ मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. कधीकाळी किडनी आणि हृदयाचा त्रास होत असल्याचे डॉक्‍टर सांगतात.
नियमांची पायमल्ली
आरोपी असलेल्या रुग्णाला सलग 7 दिवस आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी उपचाराची गरज असेल, उपचाराची खरज गरज आहे, याची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्‍टरांची समिती स्थापन करण्यात येते. समितीमार्फत उपचारासाठी दाखल करून घेताना या समितीमार्फत न्यायालयात प्रकृतीसंदर्भात माहिती देणे बंधनकारक आहे, तसे शासनाचे देखील निर्देश आहेत. मात्र बजाज यांना वर्षभरापासून पेइंग वॉर्डात उपचार करताना समिती स्थापन केली नसल्याची चर्चा आहे. विशेष असे की, उपचारादरम्यान बजाज यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना सुटी देण्यासंदर्भात केसपेपरवर नोंद केली होती. न्यायालयाच्या निर्देशाने उपचार सुरू असल्याची माहिती येथील डॉक्‍टरांना दिली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com