मेडिकलमधील औषधालयात येणाऱ्या रुग्णांचे जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

100 पेक्षा अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासी गाळ्यांची स्थिती दयनीय झालेली असल्याने या इमारतीत राहणाऱ्या मेडिकलमधील कर्मचाऱ्यांच्या परिवारांचे जीव धोक्‍यात आहेत

नागपूर : मेडिकल कॉलेजच्या टीबी वॉर्ड परिसरातील तब्बल 60 वर्षे जुन्या औषधालयाची स्थिती दयनीय झालेली आहे. गुरुवारी टीबी वॉर्डातील त्वचारोग विभागाचा पोर्च कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याने आता औषधालयातील पाच कर्मचाऱ्यांसह येथे औषध घेण्यासाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. 

टीबी वॉर्डातील त्वचारोग विभागासमोरचा पोर्च कोसळल्या प्रकरणाची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. या इमारतीच्या बांधकामाची चौकशी बांधकाम विभागाचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे वरिष्ठ अधिकारी करणार आहेत. चौकशीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता आहेत. त्यात या इमारतीला हा पोर्च होता की नाही हेही उघड होणार आहे.

कारण इमारत बांधकामाच्या नियोजनात हा पोर्च नसल्याची चर्चा महाविद्यालयाच्या परिसरात दबक्‍या आवाजात केली जात होती. ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली ती तीन दशकांपूर्वी बांधण्यात आली होती. त्या इमारतींचे अंकेक्षण नियमित होत नसल्यानेच अशा घटनेनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मागणी जोर धरु लागली आहे.

या परिसरातील 100 पेक्षा अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासी गाळ्यांची स्थिती दयनीय झालेली असल्याने या इमारतीत राहणाऱ्या मेडिकलमधील कर्मचाऱ्यांच्या परिवारांचे जीव धोक्‍यात आहेत. त्यामुळे डॉ. अभिमन्यू निसवाडे हे मेडिकलचे अधिष्ठाता असताना त्यांनी अंकेक्षण करून घेत यातील बराचसा भाग राहण्यास योग्य नाही, असा अहवाल विभागाला सादर केला गेला होता. मात्र, त्या फायली लालफीतशाहीत अडकल्याचे बोलले जात आहे. 

सरकारने जबाबदारी घ्यावी 
दरम्यान, पोर्च कोसळून मृत पावलेल्या देवनाथ रामचंद्र बागडे आणि वनिता वाघमारे यांचे शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. देवनाथ यांच्या मेंदूला जबर दुखापत तर वनिता यांच्या छाती आणि पोटावर सज्जाचा भाग कोसळल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोघांचेही मृत्यू सरकारी इमारतीत झाल्याने या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनही जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे 

धनादेश नातेवाइकांना सुपूर्द 
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टीबी वॉर्डमध्ये स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या 2 व्यक्तींच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या रकमेचे धनादेश नातेवाइकांना आज सुपूर्द केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, medical, accident, patient