रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेणारा "वाली' आला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

या कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले होते. मात्र, नवीन वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती झाली आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे दार उघडले. रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेणारा "वाली' आला असल्याची भावना नातेवाइकांमध्ये निर्माण झाली आहे.

नागपूर : गरिबांसाठी मेडिकल हाच एकमेव आरोग्याचा आधार आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारींची दखल घेण्यासोबतच रुग्णसेवेची घडी व्यवस्थित बसविण्याचे काम वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आहे.

सोबतीला वैद्यकीय उपअधीक्षकांचीही नेमणूक केली आहे. मात्र, मेडिकलमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे "दार' नेहमीच बंद असल्याने तक्रारकर्ते नातेवाईक बंद द्वार बघून तक्रार न करताच निघून जात होते. यामुळे या कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले होते. मात्र, नवीन वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती झाली आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे दार उघडले. रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेणारा "वाली' आला असल्याची भावना नातेवाइकांमध्ये निर्माण झाली आहे.
 

 

रुग्ण आहेत, म्हणून डॉक्‍टर आहेत
मेडिकलमध्ये कार्यरत वैद्यकीय शिक्षकांना उन्हाळी आणि दिवाळीच्या रजा मिळतात. रजा घेणे वैद्यकीय शिक्षक अर्थात वरिष्ठ डॉक्‍टरांचा अधिकार आहे. मात्र, मेडिकलमध्ये रुग्ण केंद्रबिंदू आहे. रुग्ण आहेत, म्हणून डॉक्‍टर आहेत. यामुळे रुग्णांच्या तक्रारींची दखल घेतली जावी, यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे जबाबदारी आहे. सुट्यांच्या काळात नव्हे, तर इतरही वेळेत येथील दार बंद असल्याने वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रारीची संख्या कमी झाली होती. तक्रारींचा पाढा वाचायचा कुणाकडे, असा प्रश्‍न रुग्णांच्या नातेवाइकांसमोर उभा ठाकला होता.

अवश्य वाचा - तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का?

तक्रार स्वीकारण्याची परंपरा खंडित
2010 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी होते. त्यांची प्रतिनियुक्ती रद्द केल्यानंतर या कार्यालयाचा कार्यभार डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडे आला. त्यांनी तक्रारींची दखल घेत रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, याची परंपरा कायम ठेवली. परंतु, मागील चार वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची तक्रार स्वीकारण्याची आणि त्यावर अंमल करण्याची परंपरा खंडित झाली होती. येथे व्यवहार गुंतला असल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांमध्ये दिसून येत होती. मात्र, अलीकडे या कार्यालयाची तक्रारी स्वीकारण्यासह प्रशासकीय कार्यभार सुरळीत सुरू करण्याला प्रारंभ झाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

पोरावर उपचार झाले जी... 
साहेब, मायं पोरगं भरती आहे. तिच्याकडे लक्ष देत नव्हते. एमएस ऑफिसमध्ये जा, असे एका तरुणाने सांगितले. येथे आलो, तर दरवाजा उघडा होता. आत गेलो, तक्रार सांगितली, येथून फोन केला, पोराची काळजी घेत आहेत जी...ही प्रतिक्रिया एका रुग्णाच्या वडिलांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur medical hospital dean office opened