रक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

रक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता

रक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता
नागपूर : क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम देशभरात राबवला जातो. बिग बी अमिताभ बच्चन यासंदर्भात दररोज टीव्ही चॅनेलवर क्षयाचे भय पळवण्याची जाहिरात करतात. तर दुसरीकडे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकलमध्ये अकोल्यावरून रेफर करण्यात आलेल्या क्षयग्रस्ताला मात्र उपचारापूर्वीच वॉर्डातून बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सुटी दिल्याने बिचाऱ्या क्षयग्रस्ताने रात्रभर वॉर्डाच्या बाहेर थंडीत कुडकुडत रात्र काढली. क्षयरोग विभागातील डॉक्‍टरांच्या संवेदना हरवल्याची प्रतिक्रिया नातेवाइकांनी व्यक्त केली.
अकोला येथील पन्नास वर्षीय राम इंगोले छाती दुखू लागल्याने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले. अकोल्यातील डॉक्‍टरांनी मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. क्षयरोगाची लक्षणे असल्याचे प्रथमदर्शनी जाणवल्याने मेडिकलच्या क्षयरोग विभागात दाखल करण्यात आले. सीबी-नॅट तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, हा अहवाल येण्यापूर्वीच बुधवारी सायंकाळी टीबी वॉर्डातील एका निवासी डॉक्‍टरने विविध कारणे सांगत जबरन सुटी दिली. या रुग्णाला वॉर्डात रक्ताची उलटी झाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली होती.
ही धर्मशाळा नव्हे....
सीबी-नॅटचा अहवाल प्रतीक्षेत असल्यामुळे सुटी देऊ नका, अशी विनवणी राम इंगोले यांनी केली. अशक्तपणा जाणवत असल्याचेही रुग्ण सांगत होता. परंतु, डॉक्‍टर आणखीच संतापले आणि "ही धर्मशाळा नव्हे...असे ओरडून सांगत त्याला सुटी दिली. सायंकाळी अकोल्याला कसे जावे हा प्रश्‍न असल्याने रात्र उघड्यावरच थंडीत कुडकुडत राम इंगोलेनी रात्र काढली. गुरुवारी, 29 नोव्हेंबरला सकाळी अकोल्याला निघून गेला.
क्षय पसरण्याची भीती
राम इंगोलेला क्षयरोग जडल्याचे सीबी-नॅट चाचणीतून स्पष्ट झाले. आता क्षयग्रस्त बसमधून प्रवास करीत गेला. रस्त्यामध्ये खोकला, शिंकण्यातून अनेकांना क्षयाची बाधा होऊ शकते. याला जबाबदार कोण? असा सवाल विचारण्यात आला.

मेडिकलच्या क्षयरोग विभागाकडून अद्याप कोण्या रुग्णाला त्रास झाल्याबाबतची तक्रार प्रशासनाकडे आली नाही. परंतु, डॉक्‍टर रुग्णांना हाकलतात, हे प्रकरण गंभीर आहे. गरिबांसाठी हे रुग्णालय आहे. यामुळे त्यांना उपचार मिळावा हा त्यांचा अधिकार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

Web Title: nagpur medical hospital news