मेडिकल वसतिगृहात मध्यरात्रीनंतर तणाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वसतिगृह. मध्यरात्रीनंतरचे 2 वाजले होते. सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. सारे वसतिगृह जागे झाले. शिवीगाळ सुरू झाली. गृहपालांपासून तर संबंधित प्राध्यापकांना मध्यरात्रीनंतर मोबाईलवर सूचना देण्यात आल्या.

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वसतिगृह. मध्यरात्रीनंतरचे 2 वाजले होते. सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. सारे वसतिगृह जागे झाले. शिवीगाळ सुरू झाली. गृहपालांपासून तर संबंधित प्राध्यापकांना मध्यरात्रीनंतर मोबाईलवर सूचना देण्यात आल्या. परंतु, येथील परिस्थिती अतिशय बिकट होती. शाब्दिक चकमकीतून कधी एकमेकांविरुद्ध मारहाणीचा आखाडा येथे रंगेल हे सांगता येत नव्हते. परंतु, काही वरिष्ठांमुळे हा प्रसंग टळला. मात्र, रात्रभर वसतिगृहात तणावाचे वातावरण होते. 

चार दिवसांपूर्वी मेडिकलमधील कार्यालय अधीक्षकाला मारहाण झाली होती. ही घटना ताजी असताना, पुन्हा येथील मेडिकलच्या वसतिगृहात एमबीबीएस आणि ओटीपीटी (भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रम)चे विद्यार्थी आमनेसामने आले. 

अगदी क्षुल्लक कारणांवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये भांडण झाले. पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रमाचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह क्रमांक 5 आहे. याच वसतिगृहात 10 ते 15 विद्यार्थी भौतिकोपचार व व्यवसायोपचार (ओटीपीटी) विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही विद्यार्थी रात्रीच्या वेळी गोंधळ घालतात, मद्यपानाच्या पार्ट्या रंगतात, अशा तक्रारी करण्यात आल्या. एकमेकांच्या या तक्रारीवरून दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून असंतोषाचे वातावरण धुमसत होते. यातील एक विद्यार्थी दशकापासून ओटीपीटीत नापास होत आहे. बाहेर "डिजे'चे काम करतो. रात्री कारमध्ये "डिजे' घेऊन येऊन वसतिगृह परिसरात जोर-जोरात गाणे लावतो. असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अधिष्ठातांकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु, याची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, सोमवारी रात्री दोन-अडीचच्या सुमारास पुन्हा हाच प्रकार पुढे आल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला. यामुळे शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. 

अधिष्ठातांच्या मध्यस्थीतून प्रकरण थंड 
दुपारी मेडिकलमधील एमबीबीएस आणि ओटीपीटी या दोन्ही गटांतील विद्यार्थी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे तक्रार घेऊन आले. अधिष्ठाता डॉ. मित्रा, गृहपाल डॉ. समीर गोलावार तसेच इतरही वरिष्ठ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी परस्पर सामंजस्यातून वाद मिटविण्याची सूचना केली. प्रकरण तापल्यास दोन्ही बाजूंनी आलेली तक्रार तसेच कायदेशीर कारवाई करून आरोग्य विद्यापीठाकडे कारवाईची शिफारस केली जाईल, असा इशारा दिला. यामुळे दोन्ही गटांतील विद्यार्थी बॅकफुटवर आले आणि प्रकरण शांत झाले. 

राजकीय हस्तक्षेपामुळे वरिष्ठ नाराज 
अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणासंदर्भात तत्काळ बैठक घेऊन प्रकरण सोडवले. परंतु, काही ओटीपीटीच्या विद्यार्थ्यांनी नागपुरातील एका पुढाऱ्याला फोन करून बोलावून घेतले. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही हे पुढारी महोदय विद्यार्थ्यांच्या या प्रकरणात पडले. यासंदर्भात ओटीपीटीच्या विभागप्रमुखांकडून स्पष्टीकरण मागविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आपसातील भांडणात झालेल्या राजकीय हस्तक्षेपावर वैद्यकीय शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता.

Web Title: Nagpur medical hostel

टॅग्स