अडीच वर्षांत पूर्ण होणार डबल डेकर 

Metro
Metro

नागपूर : मेट्रो रेल्वेने छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम निश्‍चित कालावधीच्या तुलनेत अल्पावधितच पूर्ण केले. आता या चौकात डबल डेकर पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. पुढील तीस महिन्यांत अर्थात अडीच वर्षांत हा पूल तयार करण्याचे लक्ष्य मेट्रो रेल्वेने ठेवले आहे. जयपूर मेट्रो रेल्वेनंतर नागपुरात होणारा डबल डेकर पूल हा देशातील दुसराच प्रकल्प ठरणार आहे. 

अजनी ते हॉटेल प्राइडनजीकपर्यंत प्रस्तावित मेट्रो रेल्वेच्या डबल डेकर पुलासाठी छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल पाडला. या डबल डेकर पुलाच्या कामासाठी मेट्रो रेल्वेने आवश्‍यक जागा ताब्यात घेऊन बॅरिकेड्‌सही लावले. मेट्रो रेल्वेच्या डबल डेकर पुलाच्या कामाला पुढील महिन्यात अधिवेशनादरम्यान सुरुवात होणार आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. सर्वांत वरच्या मजल्यावरून मेट्रो रेल्वे धावणार असून, त्याखालील मजल्यावरून चारचाकी वाहने, अशी पुलाची रचना राहणार आहे. याच पुलाला मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूलही जोडण्यात येणार आहे. उज्ज्वलनगरात मनीषनगरकडून येणारा उड्डाणपूल डबल डेकर पुलाला जोडला जाणार आहे. त्यामुळे या परिसरात चारपदरी डबल डेकर पूल सहापदरी होणार आहे. मेट्रो रेल्वेची कामे शहरात गतीने सुरू आहे. छत्रपती उड्डाणपूल पाडण्याचे 15 दिवसांचे काम आठ दिवसांत पूर्ण करीत मेट्रो रेल्वेने कामाची गती अधोरेखित केली.

याच गतीने या पूलाचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे. जयपूर मेट्रो रेल्वेचे काम साडेचार ते पाच वर्षात पूर्ण झाले. येथील डबल डेकर पुलाच्या कामालाही एवढाच अवधी लागला. नागपूर मेट्रोने अडीच वर्षात डबल डेकर पुलाचे काम पूर्ण केल्यास हा विक्रमच ठरण्याची शक्‍यता आहे. 


वैशिष्ट्ये 
- अजनी ते प्राईड हॉटेलनजिक 3 किमीचे अंतर 
- डबल डेकर पुलाचे आयुष्य 100 वर्षे 
- भूतलावरील रोडपासून 10 मीटर उंचीवर वाहनांसाठी रस्ता व त्यावर मेट्रोचे ट्रॅक. 
- भूतल तसेच फ्लायओव्हरवर चौपदरीकरण 
- मनीषनगरकडून येणारा उड्डाणपूल उज्ज्वलनगरात डबल डेकर पूलाला जोडणार 
- डबल डेकर पुलाला विमानतळ प्राधीकरणाचीही मंजुरी 
- मनीषनगर उड्डाणपूलाची लांबी 900 मीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com