"मेट्रो'मध्ये नोकरी लावून देण्याचा गोरखधंदा

File photo
File photo

"मेट्रो'मध्ये नोकरी लावून देण्याचा गोरखधंदा
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्यासंदर्भात काही संदेश "सोशल मिडिया'वर झळकल्याने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एजन्सीचे पीक आल्याचे दिसून येत आहे. अद्याप बेरोजगार तरुणाची फसवणूक झाली नसली तरी महामेट्रो प्रशासनाने अशा संदेशाची दखल घेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मेट्रोतर्फे नागपूर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पात भरतीसाठी रीतसर महामेट्रोच्या संकेतस्थळावर माहिती दिली जाते. मात्र, काहींनी महामेट्रोत नोकरी लावून देण्यासाठी तरुणांना आकर्षित करणे सुरू केले आहे. यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फसवणूक करण्याचा उद्देश स्पष्ट होत आहे.
सोमवारी सोशल मीडियावर ए. एन. इंजिनिअरिंग नागपूर, म्हाळगीनगर, चौक हुडकेश्‍वर रिंग रोड, नागपूर व मुंबई या एजन्सीच्या नावाने संदेश झळकला. यात मेट्रो रेल्वे प्रकल्पात दीडशे पदे भरण्यात येणार असून, तिकीट तपासणीस, देखभाल, दुरुस्तीसाठी संधी असून, कुठल्याही पदवीधराने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत साडेबारा हजार रुपये वेतन व त्यानंतर 25 ते 27 हजार रुपये वेतन देण्याबाबतही या संदेशात नमूद केले आहे. पात्र उमेदवारांनी 20 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, संपर्कासाठी 8850217483 हा क्रमांक दिला आहे. मात्र, या क्रमांकावर संपर्क केला असता बंद असल्याचे सांगण्यात आले. मेट्रोचे अखिलेश हळवे यांच्याशी संपर्क साधला असता कुठल्याही त्रयस्थ संस्थेमार्फत महामेट्रोची भरत होत नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्पात नोकरी लावून देण्यासंदर्भात एजन्सीने नोंदणी शुल्काच्या नावाने हजार रुपयांपर्यंत पैसे उकळल्याची तक्रार तरुणाने पोलिसांत केली होती. या फसवणुकीबाबतचे प्रकरण स्मार्ट सिटी प्रकल्प सीईओपर्यंत गेले होते.
त्रयस्थामार्फत पदभरती नाही
सोशल मीडियावर पदभरतीचा दावा केला जात असून, महामेट्रोने अशी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेमार्फत महामेट्रोची पदभरती होत नाही, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. महामेट्रोच्या पदभरतीची माहिती www.mahametro.org या संकेतस्थळावर किंवा वर्तमानपत्रात प्रकाशित केली जाते. कुठल्याही जाहिरातीबाबत माहिती मिळाल्यास महामेट्रोच्या संकेतस्थळासह सिव्हिल लाइन्स येथील मेट्रोहाउस तसेच 18002700557 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com