माझी मेट्रो धावली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 March 2019

नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः प्रवास करीत सुरक्षित व सहज प्रवासाची हमी दिली. उभय नेत्यांचा हा प्रवास अनेकांच्या स्मृतिपटलावर उमटला. 

नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः प्रवास करीत सुरक्षित व सहज प्रवासाची हमी दिली. उभय नेत्यांचा हा प्रवास अनेकांच्या स्मृतिपटलावर उमटला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझी मेट्रोला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह सर्व आमदार, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी आज एअरपोर्ट साउथ ते एअरपोर्ट स्टेशनपर्यंत प्रवास केला. यावेळी उभय नेत्यांनी मेट्रो प्रशासनाचे कौतुक करतानाच नागपूरकरांनाही शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, एअरपोर्ट साउथ स्टेशनवर झालेल्या मुख्य लोकार्पण सोहळ्यात महामेट्रोचे अध्यक्ष व केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी नागपूर मेट्रो देशातील अठरावी मेट्रो असल्याचे नमूद करीत यापुढे नागपूर मेट्रो शहर म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या साडेतीन वर्षांतील मेट्रोच्या कामाचा वाढता आलेख सांगताना व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी नागपूरकरांसह पोलिस, महापालिका व मेट्रो टीमचे आभार मानत कौतुक केले. 

एकविसाव्या शतकातील नागपूरची सुरुवात - मुख्यमंत्री फडणवीस 
आजचा दिवस ऐतिहासिक असून ही केवळ मेट्रोची नव्हे तर एकविसाव्या शतकातील नागपूरची सुरुवात असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. ‘स्मार्ट’ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काळाची गरज असून मेट्रोला वेग आहे तसेच ही सुविधा पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे नागपूर मेट्रो ‘सुपर सस्टेनेबल’ झाली असून नागपूरकरांना ही मोठी भेट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी नागपूरच्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा झाल्याचे नमूद करीत नागपूरकरांच्या आनंदात भर घातली. नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निविदा स्वीकृत केल्याचे त्यांनी सांगितले. 

मेट्रोमुळे नागपूरचा पर्यटन विकास - केंद्रीय मंत्री गडकरी 
मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीचीच व्यवस्था नव्हे तर नागपूरचे पर्यटनही विकसित होईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अंबाझरी स्टेशनजवळ फूड मॉल होत असून तलावात वॉटर पार्क आणि लागूनच असलेल्या जंगलामुळे हा प्रकल्प ‘इको-फ्रेंडली’ होईल, असेही ते म्हणाले. मेट्रोच्या प्रकल्पासाठी अतिक्रमण करण्यात आलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा देण्यात आली, असे नमूद करीत त्यांनी या जागेवरील अतिक्रमणासाठी प्रशासनालाही धारेवर धरले. नागपूरची मेट्रो तिच्या डिझाइनसह अनेक बाबीत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. 

‘माझी मेट्रो, ड्रीम कम्स ट्रू’ या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मेट्रोच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण टप्पे नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे मेट्रोचे प्रस्तावित स्टेशन, गड्डीगोदाम येथील चारमजली पूल, वर्धा मार्गावरील तीन मजली पुलाच्या प्रतिकृती आहेत. याशिवाय हिंगणा मार्गावरील साडेपाच हजार झाडांच्या लिटिल वूडचा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर मेट्रो पिलरची प्रतिकृती असून त्यावर धावती मेट्रो लक्षवेधक ठरत आहे. 

क्षणचित्रे 
 ५.४० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागपूरकरांपुढे आले. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात व शेवटही मराठीतून केला. 
 पंतप्रधानांनी रिमोटची कळ दाबून ई-लोकार्पण केले. 
 मेट्रोची सुविधा असलेले नागपूर देशातील अठरावे शहर ठरले. 
 खापरी ते सीताबर्डी या १३.५ किमी अंतर ट्रॅकवर मेट्रो धावणार. 
 महिलांसाठी विशेष कोचची सुविधा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Metro Run