मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय? असा सवाल दोन दिवसांपूर्वी केला आणि दुर्दैवाने त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

सेवानिवृत्तीच्या वेतनाचा लाभ मिळू शकला नाही, अशा या दुर्दैवी कर्मचाऱ्याचे नाव कृष्णा धार्मिक असे आहे.

नागपूर : शासकीय कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीची देय रक्कम आणि निवृत्ती वेतन अदा करण्यासंदर्भातील पत्रासह सेवापुस्तिकेनुसार सर्व कार्यवाही पूर्ण होणे आवश्‍यक आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून पाच महिन्यांपूर्वी कृष्णा धार्मिक निवृत्त झाले. वेतनासाठी त्यांनी खेटा मारल्या, परंतु मेयो प्रशासनाला जाग आली नाही.  मेयो प्रशासनाला विनंती केली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय? असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी केला आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

कृष्णा धार्मिक जुलै 2019 मध्ये निवृत्त झाले. यानंतर दर दिवसाला त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी मेयो रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार खेटा घातल्या. विनवणी केली, परंतु न्यू इनकॅशमेंट पेमेंट तातडीने मिळाले नाही. वास्तविक असा नियम आहे की, सेवानिवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वी सेवा पुस्तिकेतील नोंदी पूर्ण करून वेतन पडताळणी पथकाकडे पाठवण्याची गरज आहे. यानंतर लगेच त्यांना देय असलेली रक्कम तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी वेतन मिळावे, अशी कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. परंतु मेयोतील निवृत्त झालेल्या पंधरापेक्षा अधिक कर्मचारी अजूनही खेटा मारत आहेत, परंतु त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले नाही. यातील धार्मिक यांनी आता देह ठेवला आहे. त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न आतातरी त्वरित सोडवण्यात यावा, यासाठी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटने (इंटक) च्या शिष्टमंडळाने विद्यमान अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना देण्यात आले.

सहसंचालक डॉ. वाकोडे यांचे निर्देश
मेयोच्या अधिष्ठाता पदावर असताना डॉ. प्रकाश वाकोडे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ त्वरित मिळावे यासाठी दिशानिर्देश केले होते. त्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना देत होते. परंतु विद्यमान अधिष्ठातांनी या विषयाला गंभीरपणे न घेतल्यानेच कर्मचाऱ्यावर ही पाळी आली असल्याची खंत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (इंटक)तर्फे व्यक्त करण्यात आली.

सेवानिवृत्तीचा लाभ कृष्णा धार्मीक यांना मिळाला नाही. यांच्यासारखे अनेक कर्मचारी निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. आता मेयो प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास यासंदर्भात संचालक डॉ. लहाने यांच्यासह सचिव डॉ. संजय मुखर्जी यांना तक्रार करण्यात येईल.
- त्रिशरण सहारे, अध्यक्ष, इंटक.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, meyo, krushna dharmik, death