नागपुरचा नवा महापौर 22 नोव्हेंबरला ठरणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

प्रारूप मतदारयादीबाबत हरकती व सूचना नागरिकांनी 22 नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात द्याव्या, असे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

नागपूर : महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महापौरपदाची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे. महापौरपदासाठी 18 नोव्हेंबरला नामांकन दाखल केले जाणार आहे. खुल्या वर्गासाठी आरक्षणाची सोडत निघताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळा 21 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. 22 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महाल येथील नगरभवनात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी 18 नोव्हेंबरला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत महापौरपदासाठी इच्छुकाला नामांकन दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. नागपूर महापौरासाठी खुल्या प्रवर्गाची चिठ्ठी निघाल्याने सर्वांनाच दावा करता येणार आहे. महापालिकेत सर्वाधिक 108 नगरसेवक असल्याने भाजपचाच महापौर होणार, हे निश्‍चितच आहे. मात्र, कॉंग्रेसही या निवडणुकीत उमेदवार उभा करून आव्हान उभे करणार आहे. याशिवाय बसपतर्फे नामांकन दाखल होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचे 29 सदस्य आहेत. पुढील मनपा निवडणूक लक्षात घेता सक्षम महापौर देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. त्यामुळे संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. दयाशंकर तिवारी व धरमपेठ परिसराचे नगरसेवक संजय बंगाले यांच्याही नावावर एकमत होण्याची शक्‍यता आहे. खुल्या प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने स्थायी समिती व परिवहन समितीचे माजी सभापती बाल्या बोरकर हेसुद्धा इच्छुक आहेत.

प्रभाग 12 पोटनिवडणुकीची तयारी
नगरसेवक जगदीश ग्वालवंशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग 12 "ड'मधील जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारयादी धरमपेठ झोन कार्यालयात उपलब्ध आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur muncipal corporation, mayor