नागपूरमध्ये थोडा जल्लोष, मोठा असंतोष!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

नागपूर, : महापालिकेच्या उमेदवारांची नावे समोर येताच भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. शिस्तप्रिय भाजपच्या कार्यकर्त्यांनी महालातील गडकरी वाड्यासमोर निदर्शने केली तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. कॉंग्रेसने दिग्गजांना बसविल्याने शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात आला. दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांनी बंडाचे झेंडे फडकावले आहेत. काही शिवसेनेच्या आश्रयाला गेले. बसप आणि राष्ट्रवादीलाही गटबाजीने जबर धक्के बसले आहेत. 

दोन दिवस रात्रभर बैठका घेऊन भाजपने अखेरपर्यंत उमेदवारांची नावेच जाहीर केली नाहीत. थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. विश्‍व हिंदू परिषदेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या श्रीकांत आगलावे यांचे तिकीट कापल्याने बजरंगी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाड्याला घेराव घातला व निदर्शने केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी अडविली. नगरसेवक गोपाल बोहरे यांचे तिकीट कापणे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्या एका प्रभागात भाजपच्या एका उमेदवाराने एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी दाखल केली नाही. 

कॉंग्रेसमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत घोळ सुरू होता. सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक दीपक कापसे, सुभाष खोडे यांच्यासह अरुण डवरे, देवा उसरे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्याऐवजी कालपरवा शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले प्रवीण गवरे, प्रवीण सांदेरकर, सोरते, जोगी यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसमध्येही असंतोष उफाळून आला. त्यांनी विकास ठाकरे यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. 

उत्तर नागपूरमध्ये विकास ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक तसेच अभिजित वंजारी यांना धक्काबुक्की केल्याचे समजते. कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या रमण ठवकर यांना उमेदवारी दिल्याने लोकमंचचे दीपक पटेल तसेच माजी महापौर किशोर डोरले यांनी इच्छेनुसार उमेदवार दिले नसल्याने कॉंग्रेसचा एबी फॉर्म नाकारला. सर्वांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. बसपतही तिकीट वाटपावरून असंतोष उफाळून आला आहे.

Web Title: Nagpur Municipal corporation elecitons BJP Nitin Gadkari Vikas Thackray