महादंगलीचा आज फैसला 

महादंगलीचा आज फैसला 

नागपूर - भाजप हॅट्ट्रिक साधणार का? महापालिकेवर कॉंग्रेसचा तिरंगा फडकेल की नाही? शिवसेना, राष्ट्रवादी आणि बसपचे काय होणार? बंडखोर उमेदवारांचा उद्देश साध्य होईल का? या सर्वांची उत्तरे गुरुवारच्या मतमोजणीतून मिळणार आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात राजकीय दंगल सुरू होती. उद्या सकाळी दहा वाजतापासून एकाचवेळी 12 केंद्रांवर मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या बारा प्रभागांचे निकाल दुपारी दीड वाजेपर्यंत जाहीर होतील. दुपारी चारपर्यंत महापालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे शहर असल्याने संपूर्ण राज्याची नजर असलेल्या महापालिकेच्या निकालाकडे लागली आहे. महापालिका निवडणुकीसाठी काल, मंगळवारी 38 प्रभागांतील 151 सदस्यांकरिता नागपूरकरांनी मतदान केले. मागील 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पावणेदोन टक्‍क्‍यांनी मतदान वाढले आहे. 53.72 टक्के मतदान झालेल्या नागपुरात 1,135 उमेदवार रिंगणात असून प्रत्येकी दीडशे उमेदवार कॉंग्रेस व भाजपचे आहेत. बसपचे 103 तर सेना व राष्ट्रवादीचे अनुक्रमे 85 व 95 उमेदवारही स्पर्धेत आहेत. याशिवाय मनसे, भारिप, एमआयएम या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही विजयाचा दावा केला आहे. महापालिका सत्तासुंदरीच्या स्पर्धेत असलेल्या कॉंग्रेस व भाजपपैकी कोण बाजी मारणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तासुंदरी गाठण्यासाठी कुणाच्या कुबड्या लागतील काय? याचेही चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजतापासून शहरातील बाराही मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रभागाच्या चढत्या क्रमानुसार मतमोजणी होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधीपुढे मतमोजणीची प्रक्रिया प्रारंभ होईल. निवडणूक अधिकारी सुरुवातीला पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी करतील. त्यानंतर मतदान करण्यात आलेल्या कंट्रोल पॅनेलमधील मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, कंट्रोल बॅलेट उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येईल. त्यानंतर प्रक्रियेला प्रारंभ होईल. यानंतर पाऊण तासामध्ये पहिला निकाल येण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनिटांमध्ये प्रभागांचे निकाल येतील, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

बूथच्या आधारावर फेऱ्या 
एका मतदान केंद्रावरील कंट्रोल पॅनेलची मतमोजणी एका टेबलवर करण्यात येणार असून 11 झोनमध्ये 14 टेबल लावण्यात आले आहेत तर दुर्गानगर झोनमध्ये जागा कमी असल्याने केवळ 10 टेबल लावण्यात आले आहेत. 14 टेबल असलेल्या झोनमध्ये एका प्रभागासाठी जवळपास पाच ते सहा फेऱ्या होतील. 10 टेबल लावण्यात आलेल्या दुर्गानगरमध्ये 10 ते 11 फेऱ्या होतील, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक प्रभागात 70 ते 72 बूथ होते. त्यानुसार फेऱ्यांची संख्या अवलंबून राहणार आहे. 

एका उमेदवाराच्या मतमोजणीस 30 सेकंद 
कंट्रोल युनिटमधून एका उमेदवाराच्या मतमोजणीस जास्तीत-जास्त 30 सेकंदांचा कालावधी लागणार आहे. ज्या प्रभागांमध्ये जास्त उमेदवार आहेत, तेथे मतमोजणीस जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या संख्येच्या आधारावर प्रभागाचे निकाल येतील. काही प्रभागांमध्ये पन्नासावर उमेदवार असल्याने तेथील मतमोजणीस अधिक वेळ लागणार आहे. 

येथे होईल मतमोजणी 

झोन प्रभाग मतमोजणी 
लक्ष्मीनगर 36, 37, 38 उर्सुला गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाइन्स 
धरमपेठ 13, 14, 15 प्रोव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाइन्स 
हनुमाननगर 31, 32, 33 ईश्‍वर देशमुख हॉल, क्रीडा चौक 
धंतोली 16, 17, 35 बचतभवन, सीताबर्डी 
नेहरूनगर 26, 27, 28 राजीव गांधी सभागृह, नंदनवन जलकुंभ 
गांधीबाग 8, 18, 19, 20 महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग 
सतरंजीपुरा 4, 5, 21 झोनची नवीन इमारत, दही बाजार, येंडलवाडी 
लकडगंज 22, 23, 24, 25 विनायक देशमुख विद्यालय, लकडगंज 
आशीनगर 2, 3, 6 डॉ. बाबासाहेब सभागृह ललित कला भवन, ठवरे कॉलनी 
मंगळवारी 1, 7, 9 तिडके महाविद्यालय, काटोल रोड 
आरबीजीजी 10, 11, 12 जि. प. माजी शासकीय माध्यमिक शाळा, काटोल रोड 
दुर्गानगर 29, 30, 34 सिटिझन एज्युकेशन सोसायटी, क्रीडा चौकाजवळ, मानेवाडा रोड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com