एकटाच टायगर 

राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - सुमारे दहा वर्षे मित्र म्हणून शिवसेनेच्या वाघाला नजरकैदेत ठेवल्यानंतर भाजपने आता महापालिकेच्या निवडणुकीत त्याला एकटे सोडून दिले आहे. सातत्याने होणारे खच्चीकरण, नेत्यांची वाणवा, मुंबईच्या दुर्लक्षामुळे वाघ एकटा पडला आहे. संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सेनाही राहिली नाही, अशी अवस्था वाघाची शहरात झाली आहे. 

नागपूर - सुमारे दहा वर्षे मित्र म्हणून शिवसेनेच्या वाघाला नजरकैदेत ठेवल्यानंतर भाजपने आता महापालिकेच्या निवडणुकीत त्याला एकटे सोडून दिले आहे. सातत्याने होणारे खच्चीकरण, नेत्यांची वाणवा, मुंबईच्या दुर्लक्षामुळे वाघ एकटा पडला आहे. संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सेनाही राहिली नाही, अशी अवस्था वाघाची शहरात झाली आहे. 

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर भाजपने राज्यात आपली पाळेमुळे रोवली. 1995 साली युतीची राज्यात सत्ता आली. सुमारे पंधरा वर्षे युतीने छोट्यामोठ्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करून संसार केला. शिवसेनेला मुंबईतच जास्त स्वारस्य होते आणि आहे. हे लक्षात घेऊन भाजपने मुंबईसाठी तडजोडी केल्या. त्या बदल्यात नागपूरमध्ये जागा वाढवून घेतल्या. सुरुवातीला शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन अशा विधानसभेच्या चार जागा सेनेसाठी सोडल्या जात होत्या. नागपूरच्या दोन जागा भाजपने केव्हा हिरावून घेतल्या, हे सेनेला कळलेही नाही. त्यानंतर हिंगणा मतदारसंघही आपल्याकडे घेतला. युती तुटल्यानंतर रामटेकही बळकावले. आता जनाधार घसरल्याने महापालिकेतही भाजपला शिवसेना नकोशी झाली आहे. दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या युतीच्या चर्चा फक्त मुंबई महापालिकेसाठीच आहेत. नागपूरमध्ये जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. आमच्याकडे प्रचंड गर्दी असताना तुम्हाला कुठून जागा द्यायच्या, एवढेच नव्हे तर आता तुमची गरज नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 

संपूर्ण ताकद लावून जिंका 
शिवसेनेचे शहरात सहा नगरसेवक आहेत. त्यातही गटबाजी आहे. दोन नगरसेवकांनी आधीच जय महाराष्ट्र करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, अलका दलाल आणि जगतराम सिन्हा हे चार नगरसेवक वेगवेगळ्या प्रभागांत आहेत. त्यांचे आपसात फार काही पटत नाही. यामुळे त्यांनाच उर्वरित तीन उमेदवार शोधून त्यांना स्वबळावरच निवडणूक लढावी लागेल आणि आपले अस्तित्व कायम ठेवावे लागणार असल्याचे दिसून येते. शिवनेनेच्या रेशीमबाग येथील संपर्क कार्यालयातून उमेदवारी अर्ज वाटप केले जात आहे. दोन दिवसांनंतर मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांची संख्या बऱ्यापैकी असली तरी निवडून येण्याची शक्‍यता असलेल्यांची कमतरता आहे. हे लक्षात घेता संपूर्ण जागा लढण्याऐवजी काही मोजक्‍या जागांवर संपूर्ण ताकद लावून त्या जिंकाव्यात, असे मत शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: nagpur municipal corporation election shivsena