सांगा गुरुजी, देशाचे उपराष्ट्रपती कोण?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

गिट्टीखदान शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 43 असून, शाळा निरीक्षकांच्या नोंदणी पुस्तकात 33 विद्यार्थी हजर दाखविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात शाळेमध्ये 12 विद्यार्थी हजर असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार असून यात विशेष लक्ष घालून शाळा निरीक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

नागपूर : महापालिकेतील शिक्षकांना देशाच्या उपराष्ट्रपतींचेही नाव माहीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपमहापौर मनीषा कोठे यांच्या अचानक भेटीत गिट्टीखदान येथील शाळेतील भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला. प्रथम सत्राचा निकाल न बनवणे, पालकसभा न घेणे, मूल्यमापन पत्रक तयार नसल्याचे आढळून आले. याशिवाय विद्यार्थ्यांच्याही हजेरीतही अनियमितता असल्याचे पुढे आले.

महापौर संदीप जोशी यांच्या सूचनेनुसार उपमहापौर मनीषा कोठे आणि शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने यांनी सोमवारी गिट्टीखदान शाळेला आकस्मिक भेट दिली. उपमहापौर व शिक्षण समिती सभापतीच्या भेटीत मनपा शाळेतील शिक्षक वर्गावर न राहता बाहेरील परिसरात गप्पा मारत असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार बघितल्यानंतर उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी संताप व्यक्त करत शिक्षकांना खडेबोल सुनावले. विद्यार्थ्यांची हजेरी तपासली. हजेरीमध्ये अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी लावताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

ठळक बातमी - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

शाळा निरीक्षकांच्या पुस्तकात विद्यार्थ्यांची संख्या चुकीची नमूद केल्याचे निदर्शनास आले. गिट्टीखदान शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 43 असून, शाळा निरीक्षकांच्या नोंदणी पुस्तकात 33 विद्यार्थी हजर दाखविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात शाळेमध्ये 12 विद्यार्थी हजर असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार असून यात विशेष लक्ष घालून शाळा निरीक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
शाळेतील विद्यार्थ्यांचे पुस्तक, वह्या, पेपर, व्यवसायमाला ही तपासल्या. यामध्ये देखीलही गोंधळ आढळून दिसून आल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची उजळणी अभ्यास यावेळी मान्यवरांनी घेतला. यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा इशारा उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिला. शिक्षकांची उजळणी घेतली. शिक्षकांना मान्यवरांनी भारताचे उपराष्ट्रपती कोण? असा सवाल विचारला असता, श्रीमती रेवती कडू, शारदा खंडाळे, ललिता गावंडे या शिक्षकांना याचे उत्तर देता आले नाही. हा प्रकार गंभीर असून याकडे शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश उपमहापौरांनी दिले.

बेजबाबदार शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार
पुढील आठवड्यात शाळेची स्थिती सुधारली नाही तर निलबंनाची कारवाई करा, असे निर्देश उपमहापौरांनी यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे त्यांनी शाळा निरीक्षकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur Municipal teachers unaware of the Vice President of india