नाग नदी शुद्धीकरणाला सापडला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नाग नदी शुद्धीकरणाला अखेर आज मुहूर्त गवसला. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत आठवड्याभरात नाग नदी शुद्धीकरणाचा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे जपानचे राजदूत आणि या प्रकल्पाला वित्तपुरवठा करणाऱ्या जायका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. नाग नदी शुद्धीकरणाला फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याचा विश्‍वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी आज परिवहन भवन येथे बैठक घेतली. बैठकीत जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामस्तू, प्रकल्पाला पुरवठा करणाऱ्या जायका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मनपातील परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागनदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी जायका कंपनीकडून 751.39 कोटी रूपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे आणि केंद्र शासन याची हमी घेणार आहे. या कर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. यावर केंजी हिरामस्तू आणि जायका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी हमी दिली. डिसेंबर 2018 पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन त्यानंतर कामाच्या निविदा प्रक्रिया करून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असल्याचे गडकरी यांनी बैठकीनंतर सांगितले.
असा येईल निधी
केंद्र शासनाने जून 2016 मध्ये 1252.33 कोटींच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 25 टक्के अर्थात 313.80 कोटी राज्य शासन देणार, महानगरपालिका 15 टक्‍क्‍यांच्या खर्चापोटी 187.84 कोटी देईल. केंद्र शासन 60 टक्के वाटा उचलणार आहे.

Web Title: nagpur nag river news