संचालक बदलण्याचे आदेश थेट 'पीएमओ'तून! 

नितीन नायगावकर
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : 'नवे सरकार नवा राज' या वाक्‍याची प्रचिती देणाऱ्या अनेक घटना गेल्या अडीच वर्षांमध्ये देशाने अनुभवल्या. आता केंद्र सरकारने विभागीय सांस्कृतिक केंद्रांकडे मोर्चा वळला असून सातही क्षेत्रिय सांस्कृतिक केंद्रांचे संचालक बदलण्याचे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे येत्या काळात सेन्सॉर बोर्डाप्रमाणे सांस्कृतिक केंद्रांच्याबाबतीतही 'संस्कारी' अजेंडा राबविण्यात आला तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल. 

नागपूर : 'नवे सरकार नवा राज' या वाक्‍याची प्रचिती देणाऱ्या अनेक घटना गेल्या अडीच वर्षांमध्ये देशाने अनुभवल्या. आता केंद्र सरकारने विभागीय सांस्कृतिक केंद्रांकडे मोर्चा वळला असून सातही क्षेत्रिय सांस्कृतिक केंद्रांचे संचालक बदलण्याचे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे येत्या काळात सेन्सॉर बोर्डाप्रमाणे सांस्कृतिक केंद्रांच्याबाबतीतही 'संस्कारी' अजेंडा राबविण्यात आला तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल. 

पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोलकता, उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र अलाहाबाद, उत्तर पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र दिमापूर, उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र पटियाला, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तंजावर आणि पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर अशा सात केंद्रांची 28 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. या माध्यमातून देशभरातील लोकसंस्कृती एका मांडवाखाली आणणे आणि लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ देणे, हा उद्देश होता. त्यानुसार थोड्याफार प्रमाणात अपवाद वगळता प्रत्येक केंद्राची कामगिरी उत्तमच राहिली आहे.

पाच वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यीय समितीने केंद्रांचा आढावा घेऊन एक अहवाल दिला. यामध्ये आयएएस किंवा आयपीएस कॅडरचे अधिकारी केंद्रांच्या संचालकपदी नेमण्याचा नियम शिथिल करण्याचे सुचविण्यात आले. सोबतच सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ कामाचा अनुभव असलेली व्यक्तीच या पदावर नेमावी अशीही सूचना करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून तीन वर्षांपूर्वी बहुतांशी डॉ. पीयूष कुमार यांच्यासारखे आयएएस-आयपीएस नसलेले अधिकारी नेमण्यात आले.

दरम्यान, केंद्रात नवे सरकार आल्यानंतर सातही केंद्रांच्या संचालकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ प्रथमच संपतोय. दक्षिण मध्यचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांनीदेखील कार्यकाळ वाढावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी 'वाड्या'ला प्रदक्षिणाही घातल्या. थेट पंतप्रधान कार्यालयातूनच कुणालाही 'एक्‍स्टेंशन' देऊ नये, अशा सूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आल्याने उपयोग नव्हता. नव्या संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून तीन महिन्यांमध्ये ती पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

डॉ. साजिथ प्रभारी संचालक 
तंजावर (तमिळनाडू) येथील दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे विद्यमान संचालक डॉ. साजिथ नागपुरातील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे प्रभारी संचालक असतील. नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. येत्या दोन दिवसांत ते धुरा सांभाळतील, असे कळते. डॉ. साजिथ स्वतः शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे.

Web Title: Nagpur Narendra Modi PMO Censor Board