99 वे नाट्य संमेलन नागपुरातच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वारी 33 वर्षांनंतर नागपूरच्या दिशेने वळण्यासाठी सज्ज झाली आहे. 99व्या संमेलनासाठी नागपूरच्या यजमानपदाची अधिकृत घोषणाच तेवढी शिल्लक असून फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आयोजन करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारीदेखील सुरू झाली आहे.

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वारी 33 वर्षांनंतर नागपूरच्या दिशेने वळण्यासाठी सज्ज झाली आहे. 99व्या संमेलनासाठी नागपूरच्या यजमानपदाची अधिकृत घोषणाच तेवढी शिल्लक असून फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आयोजन करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारीदेखील सुरू झाली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99व्या नाट्य संमेलनासाठी आलेल्या प्रस्तावांपैकी केवळ लातूर आणि नागपूरच स्पर्धेत शिल्लक आहेत. लातूरमध्ये आजपर्यंत एकही नाट्य संमेलन झालेले नाही आणि नागपूरला एकूण तीन नाट्य संमेलने झाली आहेत. त्यामुळे या बाबतीत लातूरचा प्रस्ताव वजनदार ठरतो. मात्र, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर लातूरची बाजू नागपूरच्या तुलनेत दुबळी ठरते. याच मुद्याचा आधार घेऊन नागपूरने यजमानपदासाठी अधिक जोर लावला आणि त्यामध्ये यश आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातून आलेला प्रस्ताव म्हणूनही एक वेगळे वजन निर्माण झाले आहे. परंतु, लातूरचा प्रस्ताव मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत नागपूरचा मार्ग मोकळा होणे अशक्‍य आहे. येत्या दोन दिवसांत नागपूरच्या यजमानपदावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेने यजमानपदासाठी वारंवार प्रस्ताव दाखल केले. कधी अंतर्गत राजकारणामुळे तर कधी इतर प्रस्ताव ताकदीचे असल्यामुळे नागपूरच्या वाट्याला निराशा आली. दरम्यान, प्रसाद कांबळी, शरद पोंक्षे यांच्या नेतृत्वातील या कार्यकारिणीने ठाण्यातील 98व्या नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून आपली योग्यताही सिद्ध केली आहे. या कार्यकारिणीतील नागपूरच्या मंडळींनी सुरुवातीपासून नाट्य संमेलनाचे यजमानपद खेचून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश आले असून त्यावर अधिकृत घोषणेची मोहोर उमटणे तेवढे शिल्लक आहे. मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर आणि नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
------------------
नागपुरातील नाट्यसंमेलने
1939 ः त्र्यं. सी. कारखानीस (संमेलनाध्यक्ष)
1962 ः शं. नी. चाफेकर (संमेलनाध्यक्ष)
1985 ः प्रभाकर पणशीकर (संमेलनाध्यक्ष)

Web Title: nagpur natyasamelan news