रात्रभर खड्डे बुजवून साजरी केली गुरुपौर्णिमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

नागपूर : जयताळा मार्गावरील अष्टविनायक नगरातील युवा मंचच्या सदस्यांनी रात्रभर रस्त्यावरील खड्डे बुजवत अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

नागपूर : जयताळा मार्गावरील अष्टविनायक नगरातील युवा मंचच्या सदस्यांनी रात्रभर रस्त्यावरील खड्डे बुजवत अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
"सकाळ' गेल्या महिनाभरापासून मंगलमूर्ती चौकातील खड्डे प्रकाशित केले होते. खरे बघता या समस्यांचे निकारण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. मात्र, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींचा वसा अष्टविनायक युवा मंचच्या सदस्यांनी स्वीकारला आणि आपल्या कृतीतून तो नागरिकांना दाखवून दिला. त्यासाठी तरुणांनी एकत्रित येऊन स्वतः पैसे गोळा केले, त्यातून सिमेंट, वाळू, गिट्टी आणली आणि रात्रभर खड्डे बुजवण्याचे काम केले. प्रसंगी भीमराव भागानगरे यांच्या नेतृत्वात संकेत भोयर, रोहित गम्पावार, मंगेश दूरबुले, महेश गिरी, शुभम बोदारे, करण सरोजे, रवी शेंडे, राजेश ठाकरे, तुषार भागानगरे यांनी सहभाग नोंदवला. सध्या मंगलमूर्ती चौकातील समस्या सर्वत्र गाजत असून स्थानिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शुक्रवारी रात्री अष्टविनायक युवा मंचचे सदस्य मंगलमूर्ती चौकातील खड्डे बुजविणार असल्याचे मंचाने सांगितले आहे.
वृक्षारोपण, गरिबांना दान देण्यावर भर
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त म्हणजे शिष्याने गुरूला दक्षिणा देण्याचा शुभदिवस. त्यामुळे शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भविकांनी गर्दी केली होती. मात्र, हा दिवस केवळ धार्मिक पद्धतीने साजरा न करता अनेकजणांनी वृक्षारोपणाच्या व गरिबांना दान देत साजरा केला. अष्टविनायकनगरातील तरुणांनी तर चक्‍क रात्रीतून खड्डे बुजवून गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधला.

 

Web Title: nagpur news

टॅग्स