सहा बॅंकाकडे 500 कोटीचे जुने चलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जिल्हा बॅंकेतील जमा नोटा 
चंद्रपूर : 325 कोटी 
भंडारा : 32 कोटी 
गोंदिया : 23 कोटी 
नागपूर : 11 कोटी 
वर्धा : 50 कोटी 
गडचिरोली : 50कोटी 

नागपूर - तब्बल सात महिन्याच्या कालावधीनंतर केंद्र सरकारने जिल्हा बॅंकाकडे नोटाबंदीनंतर पडून असलेल्या जुन्या नोटा स्विकारण्याचा निर्णय बुधवारी (ता.21) घेतला. त्यामुळे नागपूर विभागातील सहाही जिल्हा बॅंकाना मोठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा डिसेंबरपर्यंत बॅंकेत जमा करण्याची मुदत दिली होती. या कालावधीत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाकडे कोट्यवधींच्या जुन्या नोटा जमा झाल्या. पण, सरकारने राष्ट्रीयकृत बॅंकाकडून जुन्या नोटा स्विकारल्या. पण, जिल्हा बॅंकाकडे जमा झालेल्या नोटा स्विकारण्यास मनाई केली. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बॅंकाकडे पाच हजार कोटी रुपयांच्या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पडून होत्या. आधिच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बॅंका यामुळे अधिक अडचणीत आल्या. जिल्हा बॅंकावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने या बॅंकात नोटाबंदीच्या काळात व्यापारी आणि बड्या नेत्यांनी त्यांच्याकडील काळा पैसा जमा केल्याचा ठपका सरकारने ठेवित या बॅंकाकडील नोटा स्विकारण्यास मनाई केली. त्यामुळे जिल्हा बॅंकाना सात महिने व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागला. सात महिन्याच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने आज (ता.21) जिल्हा बॅंकाकडील हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्विकारण्याचा निर्णय घेतला. या निणर्याचा नागपूर विभागातील सहा जिल्हा बॅंकाना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पत्र निघाले 
जिल्हा बॅंकाकडे शिल्लक असलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रिर्जव बॅंकेकडे जमा करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यासंबंधीचे पत्र देखील जिल्हा बॅंकाना आज पाठविले. रिर्जव बॅंकेकडून पैसे जमा करण्याचे निर्देश मिळाल्यानंतर या जुन्या नोटा जमा केल्या जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: nagpur news 500 crores old currency for six banks