देशात ६८ टक्के विषाक्त दुधाची विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नागपूर - मिल्क सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नोंदीनुसार देशात उपलब्ध एकूण दुधापैकी ८८ टक्के दूध भेसळयुक्त असून ६८.७ टक्के दूध विषाक्त असल्याची माहिती केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी दिली. 

नागपूर - मिल्क सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नोंदीनुसार देशात उपलब्ध एकूण दुधापैकी ८८ टक्के दूध भेसळयुक्त असून ६८.७ टक्के दूध विषाक्त असल्याची माहिती केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी दिली. 

देशभरात दुधाळू जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत असतानाही दूध उत्पादन वाढत असल्याचे दर्शविणारी शासकीय आकडेवारी पूर्णत: फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूर जिल्ह्याच्या भेटीवर आलेले अहलुवालिया यांनी पत्रकार परिषद घेऊन दुग्ध उत्पादनाशी संबंधित विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. शासकीय आकडेवारीनुसार नागपूर जिल्हा आणि शहरात गतवर्षी एकूण १२ कोटी ३२ लाख ३३ हजार लिटर दुधाचे उत्पादन घेण्यात आले आणि प्रतिव्यक्ती दररोज १५० ग्रॅम दूध उपलब्ध करून देण्यात आले. पण, प्रतिव्यक्ती दुधाची गरज ४३३ ग्रॅम आहे. दुधाची ही अतिरिक्त गरज भेसळयुक्त दुधातूनच भागविली जात आहे. 

देशातील अन्य भागात भेसळीचे प्रमाण याहून फार जास्त आहे. रेल्वेत मिळणारे दूध पिण्यास योग्य नाही. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्याने भेसळीचा धंदा सर्रास सुरू आहे. 

दूध उत्पादनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असल्यातरी भेसळयुक्त दुधामुळे त्यावर मर्यादा आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदलाही मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेला चंद्रपाल चोकसे, भूषण दडवे उपस्थित होते. 

९० दिवसांत दुधाला योग्य भाव
शेतकऱ्यांना दुधाचा अधिकाधिक दर मिळावा व ग्राहकाला कमीतकमी दरात ताजे शुद्ध दूध मिळावे यादृष्टीने मदरडेअरीच्या सहकार्यातून नागपूर जिल्ह्यात ३६३ गावांमध्ये दूधसंकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील काही केंद्रे सुरू झाली असून शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३७ ते ४० रुपयांचा दर देण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ९० दिवसांच्या आत दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

नागपुरात होणार मिल्क फेस्टिव्हल
दिल्लीत मिल्क मंडीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात लवकरच मिल्क फेस्टिव्हल आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. येथे लाइव्ह लॅब सेंटर राहील. शेतकऱ्यांचे दूध नि:शुल्क तपासून योग्य मोबदला मिळवून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: nagpur news 68 percent toxic milk sale in the country