दोन मित्र थोडक्‍यात वाचले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर - भरधाव कारवरील अचानक नियंत्रण सुटल्यामुळे २० फूट उंचीवरून कार फुटाळा तलावाच्या कठड्यावर आदळली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोनही मित्र सुदैवाने बचावले. या अपघातात कारचा चुराडा झाला असून कारमधील ऋषभ म्हैसकर आणि विशेष भाजीपाले हे दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात  सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला. 

नागपूर - भरधाव कारवरील अचानक नियंत्रण सुटल्यामुळे २० फूट उंचीवरून कार फुटाळा तलावाच्या कठड्यावर आदळली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोनही मित्र सुदैवाने बचावले. या अपघातात कारचा चुराडा झाला असून कारमधील ऋषभ म्हैसकर आणि विशेष भाजीपाले हे दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात  सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला. 

बेडकर नगर, मानेवाडा येथे राहणारा ऋषभ नरेंद्र म्हैसकर (वय २२) आणि त्याचा मित्र विशेष भाजीपाले (वय २२) हे हजारीपहाड येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी गेले होते. परत येत असताना वायुसेनानगर ते फुटाळा मार्गाने येत होते. ऋषभ हा कार चालवत होता. त्याला जास्त अनुभव नसल्यामुळे फुटाळा तलावाजवळ येताच त्याने क्‍लच दाबण्याऐवजी एक्‍सिलेटर दाबल्या गेल्यामुळे २० फूट उंचावरून कार फुटाळा तलावाच्या कठड्यावर आदळली. त्यानंतर ती कार अगदी काठावर अडकली. वजन कमी जास्त झाले असते, तर कार पाण्यात बुडाली असती. अपघाताच्या वेळी फुटाळ्यावर काही नागरिक मॉर्निंग वॉक करीत होते. त्या नागरिकांनी कारमधील दोन्ही युवकांना बाहेर काढले. लगेच पोलिसांना अपघाताची माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून उपचारार्थ रवाना केले. या अपघाताची नोंद अंबाझरी पोलिसांनी केली. 

कार चालविण्याची हौस नडली
विशेष भाजीपाले याच्या वडिलांची कार होती. मात्र, ऋषभला कार चालविण्याची हौस होती. त्याला विशेषने काही दिवसांपूर्वी कार चालविणे अर्धवटपणे शिकवले होते. ऋषभ हळूहळू कार चालवित होता. फुटाळा तलावाच्या वळणावर त्याला क्‍लच दाबायचा असताना चुकून त्याने ॲक्‍सिलेटर दाबला. त्यामुळे कारचा अपघात झाला. क्रेनच्या मदतीने चुराडा झालेली कार बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी कार जप्त केली, अशी माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली. 

योग्य ती कारवाई होईल
कारचालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास किंवा कारची कागदपत्रे नसल्यास वाहतूक नियमानुसार कारवाई करण्यात येईल. दोन्ही युवक नशेमध्ये नव्हते. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या आईवडिलांना अपघाताची माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे अंबाझरीचे निरीक्षक खनदाळे यांनी सांगितले.

Web Title: nagpur news accident