देव तारी त्याला कोण मारी? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

रुग्णवाहिका असती तर... 
सुपाजी दांदळे यांनी पत्नीला आलेगाव येथे नेण्यासाठी आरोग्य विभागाची प्रसूती रुग्णवाहिका बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना दुचाकीवरून जावे लागले. वाटेतच त्यांच्या पत्नीवर काळाने झडप घातली. जर रुग्णवाहिका मिळाली असती, तर हा अपघातही टळू शकला असता. 

पातूर - देव तारी त्याला कोण मारी, असे म्हणतात. काही प्रसंग ती म्हण खरीही ठरवतात. आसोला ते आलेगाव मार्गावर झालेल्या एका अपघातात एका गरोदर महिलेचा अपघातात मृत्यू झाला. पण, या घटनेत महिलेच्या पोटातील बाळ बाहेर पडले व ते मात्र आश्‍चर्यकारकरीत्या बचावले! आकस्मिकपणे या जगात आलेल्या या बाळाला आई गमावण्याच्या दुःखासोबतच जन्म घ्यावा लागला. 

पातूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आसोला येथील रहिवासी अरुणा सुपाजी दांदळे (वय 25) ही महिला शुक्रवारी (ता. 22) तिच्या पतीसोबत दुचाकीने आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी जात होती. कार्ला गावाजवळील फरशी नाल्याजवळ दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला बांधकाम साहित्य घेऊन आलेगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टरने जबरदस्त धडक दिली. त्यात दुचाकीवरील गर्भवती अरुणा चिरडून जागीच ठार झाली. मात्र, अपघातामुळे तिच्या पोटातून बाळ बाहेर पडले. त्याला कुठलीही इजा झाली नाही. पती सुपाजी दांदळे हेही किरकोळ जखमी झालेत. 

अपघातानंतर ट्रॅक्‍टरचालक दत्ता भराडी याने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार खंडेराव ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. बाळावर आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यावर त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी चालक दत्ता भराडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ते त्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: nagpur news accident baby safe