विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नागपूर - वर्षानुवर्षे शोषण सहन करणाऱ्या नागपूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज फुटला. शंभरावर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.

नागपूर - वर्षानुवर्षे शोषण सहन करणाऱ्या नागपूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज फुटला. शंभरावर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर इंडिगो या विमान कंपनीने जानस एव्हिएशन आणि टोरस एव्हिएशन या मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपन्यांकडून कंत्राटी कर्मचारी घेतले आहेत. जानस कंपनी १० वर्षांपासून कार्यरत असून, ५५ कर्मचारी आहेत. अलीकडेच सेवा देणाऱ्या टोरस कंपनीत ५७ कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी ड्रायव्हर आणि लोडर म्हणून कार्यरत असून, लोडिंग-अनलोडिंगचे काम करतात. वर्षानुवर्षे कार्यरत या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. सुटी घेतल्यास पैसे कापले जातात. छोट्याशा चुकीसाठी नोकरीवरून कमी केले जाते. सातत्याने अन्याय सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आज अचानक भडका उडाला. युवा स्वाभिमान पक्षाच्या बॅनरखाली या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली. सकाळपासूनच विमानतळाबाहेर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. नियुक्तिपत्र देण्यात यावे, वेतनाची योग्य पावती दिली जावी. नियमानुसार वेतन आणि वेतनवाढ मिळावी, भविष्य निर्वाह निधी नियमित भरला जावा आणि त्याची स्लिप मिळावी, नियमानुसार सुट्या मिळाव्यात आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. प्रारंभी संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा केलेला पयत्न फसला. केंद्रीय कामगार आयुक्त शेलार यांनी स्वत: आंदोलनस्थळी पोहोचून कर्मचारी आणि संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाच्या बाजू ऐकून  घेतल्या. विमान सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत स्पष्टता नाही. यामुळे किमान वेतन निश्‍चित करण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यात आले. युवा स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष नासीर खान यांच्या नेतृत्वातील आंदोलनात उपाध्यक्ष सय्यद अहमद, सचिव मोरेश्‍वर गायकवाड, उत्तम प्रधान यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: nagpur news airport Contract Employees strike