मानधन नको, पण संमेलनाला बोलवा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नागपूर - बडोदा येथे आयोजित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित साहित्यिकांनी मानधन आणि प्रवासखर्चाचा स्वतःहून त्याग करावा, असे आवाहन आयोजकांनी केले. सध्या निमंत्रितच ठरायचे असल्यामुळे प्रतिसादाचाही प्रश्‍न उद्‌भवत नाही. पण, या आवाहनाचा अफलातून परिणाम झाला असून, ‘मानधन नको, पण संमेलनात सहभागी करून घ्या’ असा तगादा महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आयोजक व महामंडळाकडे लावल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. 

गेल्यावर्षी डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्वतः यापद्धतीचे आवाहन केले होते. आयोजक आणि महामंडळाच्या नागपुरात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. जोशी यांनी हे आवाहन केले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातील केवळ एका कवीने प्रतिसाद दिला आणि मानधन व प्रवास खर्च नाकारला होता. आवाहनाचे पहिले वर्ष असल्यामुळे कदाचित पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यंदा आयोजकांनी थेट बडोद्यातून आवाहन केल्यामुळे महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्यिकांचे लक्ष वेधले गेले. यावर काही साहित्यिकांनी सोशल मीडियातून टीकाही केली. तर काहींनी त्याचे आनंदाने स्वागत केले. मात्र, आपण निमंत्रितच नसल्यामुळे निर्णयाचा आनंद तरी कुठे व्यक्त करायचा, हा प्रश्‍न अनेकांपुढे होता. त्यातूनही साहित्यिकांना मार्ग सापडू नये, हे शक्‍यच नाही.

महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी त्यावर शक्कल लढवली. संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्रे किंवा कविसंमेलनांमध्ये सहभागी होण्याची हीच उत्तम संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बडोद्यातील मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना फोन करून ‘काउंटर’ विनंती या साहित्यिकांनी केली. आम्हाला प्रवास खर्च आणि मानधन नको, पण किमान एखाद्या परिसंवादात, चर्चासत्रात किंवा कविसंमेलनात सहभागी करून घ्या, अशी विनंती केल्याचे कळते. कसाही का असेना, प्रतिसाद मिळतोय, याचा आनंदच असणार. पण, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्याचा असाही मार्ग असू शकतो, याचा शोध या मंडळींनी लावला, हे विशेष.

Web Title: nagpur news akhil bhartiy marathi sahitya sammelan