अमेरिका-जर्मनीतील डॉक्‍टरांची रुग्णसेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भातील दुर्गम भाग गडचिरोली, अमरावतीसह इतरही जिल्ह्यातील सुमारे १२० चिमुकले गंभीर आजाराच्या विळख्यात आहेत. कोणी अन्ननलिकेच्या तर कोणी फुप्फुसाच्या आजारांच्या वेदना घेऊन जगत आहेत. या साऱ्यांचे जगणे सुकर करण्यासाठी मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया कार्यशाळा  घेण्यात येत आहे. अमेरिका आणि जर्मनीतील १५ तज्ज्ञ डॉक्‍टर शस्त्रक्रियेतून या मुलांना जीवदान देतील.   

नागपूर - विदर्भातील दुर्गम भाग गडचिरोली, अमरावतीसह इतरही जिल्ह्यातील सुमारे १२० चिमुकले गंभीर आजाराच्या विळख्यात आहेत. कोणी अन्ननलिकेच्या तर कोणी फुप्फुसाच्या आजारांच्या वेदना घेऊन जगत आहेत. या साऱ्यांचे जगणे सुकर करण्यासाठी मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया कार्यशाळा  घेण्यात येत आहे. अमेरिका आणि जर्मनीतील १५ तज्ज्ञ डॉक्‍टर शस्त्रक्रियेतून या मुलांना जीवदान देतील.   

मेडिकलच्या ट्रॉमात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तर किडनी युनिटमध्ये आप्त स्वकीयांच्या जगण्याला नवा अर्थ मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मेडिकलचे सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या पुढाकारातून २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसांच्या मुलांच्या सर्जरीवर कार्यशाळा घेण्यात येत आहे. कार्यशाळेत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. विदर्भातील गडचिरोली, अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बालआरोग्य सुरक्षा अभियानातून गंभीर आजार असलेल्या मुलांची नोंद केली. मेडिकलमध्ये अनेक मुले गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. अशा दुर्मिळ आजारांवर डॉ. डेव्हिड ॲन्टकिअर (स्पाईन), डॉ. लॉव्हरेन्स केसिक (युरो), डॉ. स्टिफन रोहेल्डर, डॉ. अश्‍विन पिंपळवार, डॉ. जेम्स बुलॉक, डॉ. बिंदी नायक, डॉ. आर. कासेट्टी, डॉ. गीता दास शस्त्रक्रिया करतील. मधुर माहेश्‍वरी बालमित्र फाउंडेशन, जितेंद्र नायक बालाजी टेम्पल कमिटी आणि मेडिकल, पर्सिस्टंटच्या सहकार्यातून मुलांवर आवश्‍यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.

मेडिकलमध्ये गरिबांना योग्य उपचार मिळावे, येथे तयार होणारा डॉक्‍टर निष्णात असावा, केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर प्रात्याक्षिकाची जोड त्याला मिळावी. या हेतूने गरीब मुलांवर शस्त्रक्रिया कार्यशाळा घेण्यात येत आहे. वैद्यकीय उपकरणांसह सेवा देणारे डॉक्‍टर अमेरिका आणि जर्मनीतील आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे अनुकरण आमच्याही डॉक्‍टरांनी करावे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या प्रात्यक्षिकातून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे तंत्र शिकता येईल. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

पाच दिवसांच्या शस्त्रक्रिया कार्यशाळेतून विदर्भातील गरीब मुलांची सर्व सोय मेडिकलमध्ये केली जाईल. विशेष असे की, या मेडिकलमधील डॉक्‍टरांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल. भविष्यात मेडिकलमधील डॉक्‍टरांना हे अद्ययावत तंत्र अवगत झाल्यानंतर कायम येथे गरीब मुलांवर शस्त्रक्रिया होतील. 
- डॉ. राज गजभिये, सर्जरी विभागप्रमुख, मेडिकल

Web Title: nagpur news america german doctor patient service in medical hospital