अमरावतीत शाळकरी मुलीवर ऍसिड हल्ला 

अमरावतीत शाळकरी मुलीवर ऍसिड हल्ला 

अमरावती - नववीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शिवटेकडीच्या पूर्व प्रवेशद्वारासमोर घडली. 

संबंधित मुलगी (वय 15) शहरातील एका शाळेची विद्यार्थिनी आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती चार मैत्रिणींसोबत सायकलने शिवटेकडीच्या पूर्वेकडील पोलिसांच्या वसंत हॉललगतच्या रस्त्याने घराकडे जात होती. शिवटेकडीच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच मागून दुचाकीवरून आलेल्या युवकाने बाटलीतील ऍसिड ग्लासमध्ये घेऊन तिच्या चेहऱ्यावर फेकले. मुलीने तोंड फिरवल्याने तिच्या उजव्या गालावर ऍसिड पडले. वेदनांनी तडफडत असलेल्या विद्यार्थिनीला परिसरात फिरायला आलेल्या युवतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागातील तिच्या मामीकडे नेले. मात्र, मुलीची मामी नुकतीच घरी निघून गेली होती. ती वेदनांनी तडफडत असल्याने व सारखी रडत असल्याने श्रीकांत मेश्राम, गोपाल पंचारिया यांसह उर्वरित महिला कर्मचाऱ्यांनी मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्‍टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही. 

फ्रेजरपुरा येथे राहणारा एका मुलगा काही दिवसांपासून तिला त्रास देत होता. त्याने एकदा तिला थापड मारली होती. तिची बदनामी करणारी काही पत्रेही पाठविली होती. त्यावर त्या मुलाचा भ्रमणध्वनी क्रमांक होता, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी मुलीच्या आईला माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या पुरेशी माहिती देऊ शकल्या नाही. मुलीच्या लहान बहिणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तीन मुलांना ताबडतोब ताब्यात घेतले. मात्र, त्यांनी एका मुलाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी "त्या' मुलाचा शोध सुरू केला आहे. 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन संबंधित मुलगी तसेच तिच्या पालकांची विचारपूस केली. 

आरोपीला तत्काळ अटक करा ः पालकमंत्र्यांचे आदेश 
मुलीवर ऍसिडने हल्ला करणाऱ्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पोलिसांना दिले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे बजावले आहे. हा हल्ला विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. या घटनेत जे दोषी आढळतील त्यांना कठोर शिक्षा करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांना त्या मुलीच्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याचे आदेश दिलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com