अजनी इंटर मॉडेल स्टेशनच्या भूमिपूजनाची तयारी सुरू

अजनी इंटर मॉडेल स्टेशनच्या भूमिपूजनाची तयारी सुरू

नागपूर - पुढील ५० वर्षांचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. अजनी रेल्वे इंटर मॉडेल स्टेशनच्या (आयएमएस) भूमिपूजनाचा मुहूर्त मार्चमध्ये काढण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. अजनी आयएमएससाठी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग,  महामेट्रो, महापालिका, एनएमआरडीएचे अधिकारी उद्या विभागीय कार्यालयात खल करणार आहे. 

शहरात वाहतुकीच्या समस्या वाढली असल्याने इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टिक हबचा निर्धार केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाला राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्याची घोषणा केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांनी या प्रकल्पाचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना दिले आहे.

त्यानुसार विभागीय आयुक्तांनी उद्या, ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्र सरकार, राज्य शासन आणि  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय राखून प्रकल्पाला वेग देणे, प्रकल्पासाठी जमीन  अधिग्रहण, अजनीतील आयएमएसमधील बसस्थानक तसेच व्यावसायिक संकुलाचे डिझाईन  आदी मुद्द्यांवर खल होणार आहे. या बैठकीत प्रकल्प सल्लागार सिक्का असोसिएटचे प्रतिनिधी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे. याशिवाय या प्रकल्पाचा विकास आराखड्याच्या मंजुरीवरही खल होईल. वाराणसी येथील आयएमएस प्रकल्पाप्रमाणे अजनी आयएमएस प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात कालावधी निश्‍चित होणार आहे. या प्रकल्पासाठी एसपीव्ही स्थापन करण्यास बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुपकुमार, महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक मनोजकुमार, पश्‍चिम रेल्वेचे निवृत्त मुख्य  अभियंता कालरा, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रृजेशकुमार गुप्ता, दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. अग्रवाल, अप्पर वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, महामार्ग प्राधिकरणचे नागपूर  प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर, उपमहाव्यवस्थापक महामार्ग प्राधिकरण नागपूर अभिजित जिचकार आदी उपस्थित राहणार आहे.

प्रकल्पासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद 
अजनी आणि खापरी स्टेशनला इंटर मॉडेल स्टेशन आणि लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १६०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यांनी मार्चपर्यंत भूमिपूजन करण्याचेही निर्देश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com