आर्यनप्रसाद मिश्राला जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नागपूर - कविता ऊर्फ पिंकी ठाकूर हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेला आर्यनप्रसाद मिश्रा याचा जामीन अर्ज गुरुवारी (ता. १३) जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाल अग्रवाल यांनी मंजूर केला. 

नागपूर - कविता ऊर्फ पिंकी ठाकूर हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेला आर्यनप्रसाद मिश्रा याचा जामीन अर्ज गुरुवारी (ता. १३) जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाल अग्रवाल यांनी मंजूर केला. 

पिंकी आणि आर्यन दोघेही काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. २६ जून २०१७ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास फ्रेण्ड्‌स कॉलनीतील स्वागत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कविताचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या कविता ठाकूर आणि आर्यन मिश्राचे दहा वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. दरम्यान, दोघांनी तेथील काम सोडले. कविता एका ऑटोमोबाइल्स कंपनीत काम करू लागली.

, आर्यनही दुसरी नोकरी करू लागला. इकडे आर्यनने स्वागत कॉलनीत सदनिका घेतली आणि कवितासोबत तो लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागला. 

दरम्यान, आर्यनने यापूर्वीच लग्न केले व त्याला मुलगीही आहे, हे कळल्याने कविता कमालीची अस्वस्थ झाली. त्या अवस्थेत तिची नोकरीही गेली. घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी केली. मात्र, तिने आर्यनला सर्वस्व मानल्याने लग्नास नकार देऊन ती त्याच्यासोबतच राहत होती. याच कारणामुळे सहा महिन्यांपासून तिने घरच्यांसोबत संपर्कही कमी केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आर्यनविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावर जामीन मिळविण्यासाठी त्याने केलेल्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कविताच्या कुटुंबीयांना तिचे आर्यनसोबत राहणे आवडत नव्हते.

 तसेच तिचा भाऊ दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. तिच्या पैशावर कुटुंबीयांचा डोळा असल्याचे बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले. तर, आरोपीला जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. कैलास डोडानी, तर सरकारतर्फे सरकारी वकील रश्‍मी खापर्डे यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur news Aryan Prasad Mishra