अश्‍मयुगातील दगडी शस्त्रांनी वेधले लक्ष

अश्‍मयुगातील दगडी शस्त्रांनी वेधले लक्ष

नागपूर - अश्‍मयुगात माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा वेगळी होती. सर्वत्र घनदाट जंगल होते. माणूस जंगलात राहत असे. जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याजवळ काही साधन नव्हते. त्याच काळात दगडी शस्त्रांचा शोध लागला. परिस्थितीमुळे माणसाच्या हातून ते घडत गेले. या शस्त्रांच्या निर्मितीचा हा इतिहास पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या दोन तरुणी प्रात्यक्षिकाद्वारे उभा करीत आहेत. अजब बंगला (मध्यवर्ती संग्रहालय) येथे भेट देणाऱ्यांचे ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. 

राज्य पुरातत्त्व विभागाच्या मध्यवर्ती संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

भारतीय पुरातत्त्व विभागाचा अभिलेख आणि प्रागैतिक इतिहास विभागही या उपक्रमात सहभागी आहे. नदीच्या काठावर सापडणाऱ्या गुळगुळीत दगडांनी मोठ्या दगडांवर घाव करून निमुळती धार असलेला तुकडा वेगळा करण्यात येतो. ब्लेड किंवा चाकूप्रमाणे या दगडांना धार असते. अश्‍मयुगात प्राण्यांची शिकार करण्यासाठी अशी शस्त्रे तयार केली जायची. डेक्कन कॉलेजमध्ये प्रागैतिहासिक विषयात पीएच.डी. करणाऱ्या गरिमा खनसिली आणि नम्रता बिस्वास या दोन तरुणी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने छोटी दगडी शस्त्रे तयार करण्याचे प्रात्यक्षिक देत आहेत. हा दगड फोडण्याचेही एक तंत्र आहे, ते वापरले नाही तर ओबडधोबड दगडाशिवाय काहीच हाती लागत नाही, असे गरिमा आणि नम्रता म्हणतात. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त उद्या (बुधवार) अरबी, फारसी आणि उर्दू अभिलेखांचे प्रदर्शन, मातीचे भांडे बनविण्याची कार्यशाळा, गुरुवारी (ता. २३) भारतीय पुरातत्त्वात दडलेला निसर्ग, शुक्रवारी (ता.२४) शिल्पकृती तर शनिवारी (ता.२५) प्रागैतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विराग सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन केले असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.

अजब बंगला सौरऊर्जेवर
पुढील महिन्यापासून नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय सौरऊर्जेवर चालणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत मध्यवर्ती संग्रहालयाला लागणारी वीज २५ किलोवॉटच्या सोलर पॅनल्समधून वापरली जाणार आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेची यंत्रणा असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील हे एकमेव संग्रहालय ठरणार आहे. त्याचवेळी १९० सीसीटीव्ही कॅमेरे संग्रहालयाच्या परिसरात लावण्यात येणार आहेत. त्याचेही काम सुरू झाले असून, पुढील महिन्यात अधिवेशन कालावधीत या दोन्ही उपक्रमांचे उद्‌घाटन होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com