'गुलामनबी व पवार करणार नेतृत्व'

'गुलामनबी व पवार करणार नेतृत्व'

नागपूर - विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चात सर्वच विरोधीपक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे गुलामनबी आझाद आणि राष्ट्रवादीतर्फे शरद पवार संयुक्तपणे नेतृत्व करणार आहेत. नेतृत्व आणि श्रेयासाठी स्पर्धा नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी १२ डिसेंबरला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे  मोर्चाने विधानभवनावर धडक दिली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसतर्फे गुरुवारी हिंगणा मार्गावरील अनसूया मंगल कार्यालयात नागपूर विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विलासराव मुत्तेमवार, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार सुनील केदार, माजी आमदार एस. क्‍यू. जमा, बंडू धोत्रे, अविनाश वारजूरकर, मारोतराव कोवासे आदी प्रामुख्याने उपस्थित  होते. अशोक चव्हाण यांनी मोर्चाच्या पूर्वतयारीचा जिल्हानिहाय आढावा घेत पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले. या वेळी गर्दी जमविण्याचेही ‘टार्गेट’ ठरवून देण्यात आले. 

अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व गुलामनबी आझाद व शरद पवार मोर्चाचे संयुक्त नेतृत्व करतील. राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आले असून ते यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महामोर्चानंतर सरकारने नमते घेत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कुणालाही लाभ मिळाला नाही. यामुळे जनतेत रोष आहे. शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी हा मोर्चा आहे. कर्जमाफी, हमीभावानुसार शेतमालाची ऑनलाइन खरेदी, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची अधोगती आदी विषयांना मोर्चाद्वारे वाचा फोडण्यात येईल. संघटनात्मक विचार बाजूला ठेवून मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. मोर्चात केवळ काँग्रेसचे दीड लाख तर एकूण ३ लाखांहून अधिक कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला. 

असंतुष्टांची पाठ
काँग्रेसमधील नाराज नेते अनीस अहमद, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, तानाजी वनवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीला पाठ दाखविली. याबाबत विचारणा केली असता खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोबत काम करण्यास इच्छुक असणारे बैठकीला आले आहेत. गटबाजीला फारसे महत्त्व नसल्याचे सांगून यावर भाष्य करण्यास टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com