राणे स्वतःच फुटले...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नागपूर - ""माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॉंग्रेसमधून भाजपने फोडले नसून ते स्वतःच फुटले,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची सोमवारी फिरकी घेतली. 

नागपूर - ""माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॉंग्रेसमधून भाजपने फोडले नसून ते स्वतःच फुटले,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची सोमवारी फिरकी घेतली. 

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कर्जमाफीबद्दल अद्याप सरकारने कोणतेही ठोस पावले उचलली नसल्याच्या विरोधात यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस समितीने शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण करणार आहेत. यासाठी ते मुंबईहून आज सकाळी नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी राणे यांची फारशी दखल न घेता बोलणे टाळले. 

राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. अशोक चव्हाण यांची काहीही क्षमता नसून ते कॉंग्रेसला रसातळाला नेतील, असे भाकीत राणे यांनी केले होते; परंतु काही दिवसांपूर्वीच नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. यामुळे राणे यांच्यावर ते पलटवार करतील, असे वाटत होते; परंतु त्यांनी राणे यांची फारशी दखल घेतली नाही. 

""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीला भाजपचेच नेते कंटाळले आहेत. तेच आता स्वतःला व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ शोधत आहेत,'' असेही या वेळी अशोक चव्हाण म्हणाले. तत्पूर्वी, चव्हाण यांचे विमानतळावर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात ढोलताशे वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. 

आधी मतदारसंघ मजबूत करावा 
नागपूरच्या कॉंग्रेसला गटबाजीची जुनी परंपराच असल्याचे सांगून त्यांनी या गटबाजीवर फारसे मत व्यक्त केले नाही. कॉंग्रेसमधील असंतुष्टांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. संवादातून काही मार्ग निघू शकेल; परंतु ते दिल्लीत तक्रार करतात. याला माझी काही हरकत नाही. त्यांनी पहिल्यांदा आपला मतदारसंघ मजबूत करावा व त्यानंतर तक्रार करावी, असा सल्लाही त्यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांना दिला.

Web Title: nagpur news ashok chavan narayan rane congress