अविनाश भुतेची कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेल्या अविनाश भुते याने गुरुवारी (ता. १८) विशेष एमपीआयडी न्यायालयात शरणागती पत्करली. या वेळी त्याने केलेली तात्पुरता जामीन मंजूर करण्याची मागणी न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी फेटाळून लावला.

नागपूर - वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेल्या अविनाश भुते याने गुरुवारी (ता. १८) विशेष एमपीआयडी न्यायालयात शरणागती पत्करली. या वेळी त्याने केलेली तात्पुरता जामीन मंजूर करण्याची मागणी न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी फेटाळून लावला.

जामिनासाठी ठरवून दिलेल्या अटींचा भंग झाल्यामुळे नागपूर सत्र न्यायालयाने भुते याचा जामीन २७ नोव्हेंबर रोजी रद्द करून त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. तसेच, अटींमध्ये बदल करण्याचा भुते याचा अर्जदेखील फेटाळून लावला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी त्याचे दोन्ही अपील खारीज केले.  त्यानंतर भुते याने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी हा निर्णय चार आठवड्यांसाठी स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने काही अटी लागू करून हा निर्णय चार आठवडे स्थगित ठेवला. परंतु, या कालावधीदरम्यान भुते याने सर्वोच्च न्यायालयात केवळ जामिनाच्या प्रकरणातच विशेष अनुमती याचिका दाखल केली. अटी कायम ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध तो या मुदतीमध्ये याचिका दाखल  करू शकला नाही. परिणामत: उच्च न्यायालयाने त्याला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.

सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे शरणागती पत्करण्याशिवाय भुते याच्यापुढे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. यानुसार त्याने गुरुवारी  शरणागती पत्करली. या वेळी झालेल्या सुनावणीदरम्यान तात्पुरता जामीन मिळण्यासाठी अर्ज  केला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. तसेच त्याने दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल. याप्रकरणी भुतेतर्फे ॲड. देवेंद्र चौहान तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. 

असे आहे प्रकरण
वासनकर याने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींनी फसवणूक केली. त्यातील बरीचशी रक्कम त्याने अविनाश भुते याच्यासह चावला आणि राठी या दोन नामांकित उद्योजकांच्या खात्यात वळती केली. यानंतर गुन्हे शाखने अविनाश भुते याच्यासह दोन्ही उद्योजकांच्या घरांसह प्रतिष्ठानांवर  छापा टाकून बरीच कागदपत्रे जप्त केली होती. अविनाश भुते याच्याकडून १३ कोटी ५० लाख रुपये वसूल करायचे होते. मात्र, ते भरण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने गुन्हे शाखेने त्याच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून गोदाम सील करीत त्याला अटक केली होती. यानंतर भुतेने वेळोवेळी घुमजाव केले असून पैसे भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे. 

Web Title: nagpur news avinash bhute crime