अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर बौद्धांचाही हक्क - भन्ते सुरई ससाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी स्थळी झालेल्या उत्खननात बौद्धकालीन अवशेष मिळाले असून, या ऐतिहासिक तथ्यांकडे केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाने दुर्लक्ष करू नये. या जागेच्या मालकी हक्कावर बौद्ध वारशाला स्थान मिळावे, अशी मागणी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य भन्ते सुरई ससाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

अयोध्यातील वादग्रस्त जागेबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावरील अंतिम युक्तिवादाला येत्या 23 मार्चपासून सुरवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भन्ते सुरई ससाई यांनी केलेल्या विधानास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या वादग्रस्त जागेच्या उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळाले असून, याची पुष्टी अलेक्‍झाडर कनिंगहॅम, राहुल सांकृत्यायन, डी. डी. कोसंबी, डॉ. रोमिला थापर व डॉ. जगन्नाथ उपाध्याय यांनी केली आहे.

बाबरी मशीद ही बाबराने बांधलीच नव्हती, तर ती त्याच्या सरदाराने बांधली होती. ही ऐतिहासिक तथ्ये मांडण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने बौद्ध अभ्यासकांना व संघटनांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोण आहेत भन्ते सुरई ससाई
भन्ते सुरई ससाई हे मूळचे जपानचे असून, गेल्या 50 वर्षांपासून ते नागपुरात बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करीत आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्वही स्वीकारले असून, नागपुरातील दीक्षाभूमीचे संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली आहे.

Web Title: nagpur news ayodhya dispute place bauddha bhante surai sasai