‘बीबीए’ पेपरच्या चौकशीसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए तृतीय वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. परीक्षा सुरू झाल्याच्या दीड तासाने हा घोळ लक्षात आल्याने आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. मंगळवारपासून (ता. २०) बीबीएच्या परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षेचा पहिलाच दिवशी तृतीय वर्षाचा ‘आंतरप्रिनरशीप डेव्हलपमेंट’ (नवीन अभ्यासक्रम) हा पेपर होता. याच केंद्रावर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही या विषयाचा पेपर होता. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार तर नियमित विद्यार्थ्यांना  नवीन अभ्यासक्रमानुसार पेपर मिळणे अपेक्षित होते. मात्र, परीक्षा विभागाच्या चुकीमुळे जुन्या अभ्यासक्रमाच्या पेपरवर नवीन अभ्यासक्रम व नवीन अभ्यासक्रमाच्या पेपरवर जुना अभ्यासक्रम अशी छपाई करण्यात आली. परीक्षकांच्या चुकीमुळे हा घोळ निर्माण झाला होता.  अभ्यासक्रम थोडाफार मिळताजुळता असल्याने विद्यार्थ्यांनी काही वेळ पेपर सोडविला. काही वेळाने तो जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परीक्षा प्रमुखाच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर दीड तासांनी परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचा पेपर दिला. यादरम्यान परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. आता हा घोळ नेमका कुणामुळे झाला याची कारणे शोधण्यासाठी विद्यापीठाने चौकशी समिती तयार केली आहे. ही समिती आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठवून चुकी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

Web Title: nagpur news BBA nagpur university

टॅग्स