सुतावरून विकासाच्या वाटेवर

सुतावरून विकासाच्या वाटेवर

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात या समाजाचा सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर भावसार समाज भारतात आला. समाजाचे आराध्य दैवत हिंगलाजमाता. मात्र राहिली पाकिस्तानात. हिंगलाजमाता शक्तिपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगरातील गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानात या मंदिराला ‘नानीका मंदिर’  म्हणून ओळखतात. भारतात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या दोन कोटींवर भावसार समाजाला कुलदैवताच्या दर्शनासाठी सहज जाणे शक्‍य होत नाही. यामुळे हुबळी येथे अंबाभवानी शक्तिपीठाची उभारणी करण्यात येत आहे. देशभरात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या भावसार समाजाची पहिली अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेची स्थापना कर्नाटकमध्ये झाली. 

भावसार समाजाचे नाते कापसातून सरकी निघाल्यानंतर तयार होणाऱ्या सुताशी आहे. कापसाच्या सुताला रंग देण्याचा व्यवसाय भावसार समाजाचा. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय रंगारींचा.  परंतु, काळाच्या ओघात हा व्यवसाय जवळपास बंद झाला आहे. ओबीसी संवर्गात मोडणाऱ्या  या समाजातील युवा पिढीचा कल शिक्षणाकडे वाढला. नोकरी व अन्य व्यवसायातून भावसार समाज विकासाकडे वाटचाल करीत आहेत. भावसार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलनाचा मार्ग चोखाळला आहे.

समाज एका शृंखलेत 
देशभरात नदीच्या काठावर वसलेला हा समाज. नदीच्या तिरावर लांबच लांब सूत रंगवून ते वाळत घालत असत. यामुळे या समाजाचा ‘डेरा’ हा नदीकाठावरच. अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेची स्थापना कर्नाटकात सर्वप्रथम सन १९११ मध्ये करण्यात आली. नुकतेच देशपातळीवर या महासभेचा शतकी महोत्सव हुबळी (कर्नाटक) येथे साजरा झाला. अखिल भारतीय स्तरापासून तर जिल्हा पातळीवर भावसार समाजाच्या संस्थांची बांधणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केली आहे. महिलांसाठीही अ.भा. क्षत्रिय महिला महासभेपासून तर स्थानिक पातळीवर संस्था कार्यरत आहेत. भावसार क्षत्रिय समाजाला देशपातळीवर एकत्रित आणणारी अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा ही एकमेव संघटना आहे.  सामाजिक हितासाठी ही महासभा देशपातळीवर काम करीत आहे. त्यात प्रामुख्याने भावसार समाजाची शक्ती संघटित करण्यापासून तर समाजाची ओळख निर्माण करून देण्याचे काम केले जाते. शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन, आर्थिक विकास आणि अर्थ पुरवठा, युवा पिढीचा सामाजिक, शैक्षणिक विकास, समाज भवनामार्फत सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण, पुरुषांप्रमाणे महिलांचीची शक्ती या समाजाने ओळखली आहे. भावसार समाजातील युवा-युवतींसाठी परिचय संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील संस्थांशी नाते जोपासत ठेवण्याला ही महासभा प्राधान्य देत आहे. हेच धोरण जिल्हा पातळीवरील संस्थांकडून जोपासले जाते.

अक्षय्य तृतीयेला विवाह सोहळा  
नागपूर तसेच विदर्भात या समाजाची स्वतंत्र ओळख आहे. सामाजिक कार्याचा वसा या समाजाने स्वीकारला आहे. संस्थेच्या माध्यमातून नागपूर भावसार समाज पंचकमिटीची उभारणी करण्यात आली आहे. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर भावसार चौक आहे. येथे समाजाचे कुलदैवत श्री हिंगुलंबिकामाता मंदिर आहे. भावसार समाजाच्या साडेबारा पोटजाती संघटित आहेत. भावसार समाजासह मंदिरात सर्व जातीधर्माचे नागरिक येथे श्रद्धेने येतात. दरवर्षी या समाजाचे अक्षय्य तृतीयेच्या पर्वावर गरीब तरुण तरुणींचा विवाह लावून देण्याचा विशेष उपक्रम नागपूरच्या भावसार महिला मंडळ, भावसार युवक मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. 

शिक्षणावर भर
भावसार समाजात पूर्वीच्या तुलनेत शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुले-मुली विदेशातही जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात या समाजातील मुले-मुली मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. विद्या उत्कर्ष निधी ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत हजारांपेक्षा अधिक मुलामुलींना याचा लाभ घेतलेला आहे. समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींना समाजाच्या कार्यात जोडण्याकरिता ‘भावसार व्हिजन इंडिया’ची राज्य स्तरावर स्थापना करण्यात आली. भावसार समाजात सामाजिक काम करण्यासाठी राज्यभरात स्थानिक पातळीवर संस्था आहेत.

सामाजिक उपक्रम
भावसार क्षत्रिय महासभेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघटनेच्या पातळीवर तसेच जिल्हा पातळीवरही वधू-वर परिचय मेळावे घेण्यात येतात. सामूहिक विवाह सोहळ्यांचेही आयोजन केले जाते. तसेच लोकांचे वैयक्तिक प्रश्‍नही सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. हिंगलाजमाता जन्मोत्सव, नवरात्र उत्सव समाज मोठ्या उत्साहाने साजरा करतो. समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेतर्फे आर्थिक मदत तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. विद्यार्थी गुणगौरव सोहळे घेण्यात येतात. समाजातील संतांचा गौरव केला जातो.  स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात समाजातील युवक महिला संघटित होऊन काम करतात. कन्यारत्न असलेल्या पालकांचा सत्कार सोहळा घेतला जातो. सुनेच्या हस्ते सासूंचा आणि सासूंच्या हस्ते सुनांचा सत्कार सोहळा घेतला जातो. 

अवयवदानाचे महत्त्व 
अलीकडे समाजात अवयवदानाचे महत्त्व रुजविण्यासाठी ‘भावसार व्हिजन इंडिया’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या चळवळीतील लोकप्रबोधनाचे फलित म्हणजे त्यापासून प्रेरणा घेऊन समाजातील सुरेखा भावसार यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्युपश्‍चात त्यांचे अवयवदान केले. भावसार समाजातील हे पहिले अवयवदान आहे. स्वतः सुरेखा यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही शेवटची ही इच्छा कुटुंबाने पूर्ण करून अवयवदानाची चळवळ सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. भावसार समाजाकडून अवयवदानाच्या चळवळीच्या जनजागृतीसाठी भावसार डॉक्‍टर्स फोरम आणि भावसार व्हिजन इंडियाकडून  सातत्याने प्रयत्न केला जातो. स्थानिक पातळीवर सुभाष गोजे, दीपा लखपती, विवेश खारवे यांच्यासह अनेकजण कार्यरत आहेत.  

गणेशोत्सवाचे संस्थापक भाऊसाहेब रंगारी 
भावसार समाजाला संत जनाबाईंच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तसेच भावसार समाजातील भाऊसाहेब लक्ष्मण जावळे ऊर्फ भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक असे संबोधतात. ते स्वातंत्र्य संग्रामातील सैनिक होते. १८९२ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाची पुण्यात मुहूर्तमेढ रोवली. दहा दिवस वेगवेगळे सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम येथे घेण्यात आले होते. या उपक्रमाचे केसरीतून लोकमान्य टिळकांनी २६ सप्टेंबर १८९३ रोजीच्या अंकात कौतुक केले होते.

इतिहासावर एक नजर 
भावसार समाजाच्या निर्मितीला आध्यात्मिक-धार्मिक आधार आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील हा ‘क्षत्रिय’ समाज. तथापि, परशुरामाच्या पृथ्वी निःक्षत्रिय करण्याच्या प्रतिज्ञेमुळे हिंगलाजमातेला भावसार वंशज शरण गेला, अशी मान्यता आहे. यामुळे परशुरामापासून या समाजाला अभय मिळाले. त्या काळापासून जंगलातील पाने, फुले, वनस्पती व मुळांपासून रंग बनविण्याची कला अंगीकारून हा समाज रंग काढण्याचे काम करू लागला. पुढे रंगारी अशी या समाजाची ओळख बनली. यासाठी पाण्याची गरज असल्याने भावसार समाज देशातील गाव खेड्यांत नदी काठावर आजही वसला आहे. गुजरात हे भावसार क्षत्रिय समाजाचे मूळ स्थान मानले जाते. व्यवसाय नोकरीनिमित्त समाज देशभर पसरला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशात या समाजाची लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. सूत रंगविल्यानंतर कोष्टी (हलबा) समाज त्यापासून वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय करीत होते. हलबांचा विणकरी व्यवसाय बंद पडल्यानंतर भावसारांच्या रंगाई व्यवसायावरही संकट आले. यामुळे शिक्षण-नोकरी व इतर व्यवसायाकडे वळल्याने या समाजाची रंगारी ही ओळख आता इतिहास जमा झाली आहे.

भावसार समाजाची साडेतीन पीठे
महाराष्ट्र आणि विदर्भात भावसार समाजाच्या आदिमाया शक्तीची मुख्य अशी साडेतीन पीठे  आहेत. मुख्य शक्तिपीठाची १०८ उपपीठे आहेत. त्यांनासुद्धा शक्तिपीठ असेच संबोधले जाते.
१) महालक्ष्मी कोल्हापूर - पूर्णपीठ
२) तुळजाभवानी तुळजापूर-पूर्णपीठ
३) रेणुकामाता माहूर- पूर्णपीठ
४) सप्तशृंगीमाता वणी -अर्धपीठ

भावसार क्षत्रिय महासभेच्या अधिपत्याखाली विविध संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. समाजाला एकत्रित आणण्यासोबतच युवा पिढीला उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्याचेही काम प्राधान्याने केले जाते. समाजाच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लावण्याचा भावसार समाजाचा ‘अजेंडा’ आहे.
- सुभाष शंकरराव गोजे, अध्यक्ष, नागपूर भावसार समाज पंचकमिटी.  

संकलन - केवल जीवनतारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com