सायकलच्या आठवणी "स्टोअर'मध्ये जमा 

भाग्यश्री राऊत
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किरायाने घेऊन सायकल शिकण्याच्या प्रत्येकाच्या आठवणी आहेत. अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत मैदानांवर हे चित्र बघायला मिळायचे. पण, काळाच्या ओघात किरायाने मिळणाऱ्या सायकल आणि आठवणी "स्टोअर'मध्ये जमा झाल्या आहेत. सायकलच्या चाकांचा वेग मंदावताना उत्पन्नाचेही चक्र उलटे फिरू लागले. 

"सायकल किरायाने मिळेल' असे फलक दुर्मीळ झालेच. शिवाय "सायकल किरायाने मिळेल का?' हा लहान मुलांचा आवाज ऐकूनही खूप वर्ष झाल्याचे सायकल स्टोअर्सवाले सांगतात. खाऊच्या पैशांतून किरायाची सायकल घेणारी मुलं आता मोबाईलमध्ये व्यस्त झाली आहेत. एक रुपये तासाला मिळणारी सायकल आता दहा ते पंधरा रुपये तासाला मिळते, पण मुलेच येत नाहीत. सायकल चालविणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्याच्याशी संबंधित एकूणच व्यवसायाला फटका बसला. सायकल स्टोअर्सवाले आता दहा ते पंधरा हजार रुपयांचीही कमाई होईल की नाही, याबाबत साशंक आहेत. 

मानेवाडा चौकातील संजय सायकल स्टोअर्सचे मधुकर सवाई (वय 58 वर्ष) गेल्या 25 वर्षांपासून या व्यवसायात आहेत. पूर्वी प्रत्येक घरात एक तरी सायकल असायची, आज मात्र एखाद्याच घरात सायकल बघायला मिळते. त्यामुळे आमच्या उत्पन्नाचे दोरही कापले गेले, असे ते सांगतात. 

उदरनिर्वाह चालविणे कठीण 
दहा-बारा वर्षांपूर्वी एक ते दोन रुपये प्रतितासाने सायकल किरायाने द्यायचो. तेव्हा लहान मुले व मोलमजुरी करणारे लोक किरायाने सायकल घेऊन जायचे. आता लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे सायकल किरायाने घेणारे गिऱ्हाईक कमी झाले. हळूहळू सायकल किरायाने देणेही मी बंद केले. या व्यवसायात मिळकत चांगली असल्यामुळे कारकुनपदाची नोकरी सोडून सायकल स्टोर्स सुरू केले, पण आता त्या भरवशावर उदरनिर्वाह चालवावा अशी स्थिती नसल्याची खंत मधुकर सवाई व्यक्त करतात. 

सायकल रिपेअरिंग स्टोअर्सची कमाई 

पूर्वी ः 50 हजार रुपये (महिन्याला) 
आज ः 10 हजार रुपये (महिन्याला)

Web Title: nagpur news bicycle in store