'राहुल गांधींशी फोनवर चर्चा, भेटही घेणार' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

भाजपची नीती "युझ अँड थ्रो' अशी आहे. भाजप हा नेत्यांचा वापर करून घेते व फेकून देते, असा आरोप करीत ते म्हणाले, ज्या पक्षाला लालकृृष्ण अडवाणी यांनी वाढविले, त्यांनाच त्यापक्षाने आता अडगळीत टाकले आहे. भाजपमध्ये अनेक असंतुष्ट नेते आहेत. वेळ आल्यानंतर त्यांच्याशी उघडपणे चर्चा करू, असेही ते म्हणाले

नागपूर - "कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा फोन आला होता. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे,' नमुद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोल्यात शेतकरी परिषद होणार असल्याची माहितीही दिली. या परिषदेत माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा सहभागी होणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. 

अकोल्यात 1 डिसेंबर रोजी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. या परिषदेला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह विदर्भातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात या हंगामात कापूस,सोयाबीन व धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने हमी भावाने खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, परंतु या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. कर्जमुक्तीचे दिलेले प्रमाणपत्र राज्य सरकारने परत घेतले आहे. सोयाबीन शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. 200 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. कापूस खरेदीची केंद्रेही राज्यसरकारने सुरू केली नाही. शेतकऱ्यांचे हे प्रश्‍न मांडण्यासाठी परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

'भंडारींनी माझ्या भानगडीत पडू नये' 
भाजपचे राज्याचे प्रवक्ता माधव भंडारी इतिहासाचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचे आत्मपरीक्षण करावे. माझ्या भानगडीत पडू नये, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, असा इशारा भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दिला. दोन दिवसापूर्वी भंडारी यांनी पक्ष सोडण्यापूर्वी पटोले अशीच बेताल वक्तव्ये करीत असतात, ते "आदत से लाचार' आहे, अशी टीका केली होती. 

वापरा अन फेका, भाजपची निती 
भाजपची नीती "युझ अँड थ्रो' अशी आहे. भाजप हा नेत्यांचा वापर करून घेते व फेकून देते, असा आरोप करीत ते म्हणाले, ज्या पक्षाला लालकृृष्ण अडवाणी यांनी वाढविले, त्यांनाच त्यापक्षाने आता अडगळीत टाकले आहे. भाजपमध्ये अनेक असंतुष्ट नेते आहेत. वेळ आल्यानंतर त्यांच्याशी उघडपणे चर्चा करू, असेही ते म्हणाले. 

नोटबंदीच्या काळातील बळींना शहीद घोषित करावे 
नोटाबंदी झाल्यानंतर बॅंकांच्या रांगांमध्ये उभे राहणाऱ्या 300 लोकांचा मृत्यू झाला, त्यांना शहीद घोषित करावे, किती बनावट नोटा बाहेर आल्या व काळा पैसा बाहेर आला, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हे सरकार अप्रामाणिक आहे, असा टोला त्यांनी मारला. 

Web Title: nagpur news: bjp nana patole