वेतनासाठी ओव्हरड्राफ्ट काढण्याची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नागपूर - भाजप सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत टाकल्याचा आरोप करीत कर्जाची मर्यादा संपल्याने आता नव्याने कर्ज मिळणार नसल्याचे विधानसभेतील काँगेसचे उपगट नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य आर्थिक डबघाईस आले असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ओव्हरड्राफ्ट काढण्याची नामुष्की सरकार ओढावणार असल्याचे नमूद करीत त्यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका केली. 

नागपूर - भाजप सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत टाकल्याचा आरोप करीत कर्जाची मर्यादा संपल्याने आता नव्याने कर्ज मिळणार नसल्याचे विधानसभेतील काँगेसचे उपगट नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य आर्थिक डबघाईस आले असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ओव्हरड्राफ्ट काढण्याची नामुष्की सरकार ओढावणार असल्याचे नमूद करीत त्यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका केली. 

१९९५ ला प्रथम युतीची सरकार आले. त्यावेळी त्यांनी राज्यावर कर्जाचा बोजा चढवला होता. त्यानंतर काँग्रेस-राकाँची आघाडी सरकार सत्तेत आले. १५ वर्षे आघाडी सत्तेत राहिल्यानंतर राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज होते. मात्र, या सरकारने तीन वर्षांत दीड लाख कोटींचे नव्याने कर्ज घेतले. आता राज्याच्या कर्जाची मर्यादा संपली आहे. त्यामुळे नव्याने कर्ज मिळणार नाही. शासनाची पत संपली आहे. भाजपने विकासकामाच्या नावे वायफळ खर्च केला. नागपूरच्या सिमेंट रस्त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आणि त्यांना ॲडव्हान्स पैसा दिला. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या सर्वेवरही कोट्यवधी खर्च करून शासनाला चुनाच लावण्याचे काम केल्याचा आरोप आमदार वडेट्टीवार यांनी केला. तिजोरी रिकामी आहे. महसूलमंत्र्यांनी विकासकामात कपातीचे धोरण आधीच जाहीर केले आहे. दोन, तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांचे पगार देणेही अवघड होणार असून त्यासाठी सरकारला ओव्हरड्राफ्ट काढावे लागेल, असे ते म्हणाले. एसटीचा एक हजार कोटीचा निधी कर्जमाफीसाठी वळवून शासनाने असंवैधानिक कार्य केल्याचेही ते म्हणाले. 

१६ हजार वीज कनेक्‍शन कापले
विदर्भातील शेतकरी आधीच अडचणीत सापडला असताना शासनाने त्यांचे वीज कनेक्‍शन कापण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत पूर्व विदर्भातील १६ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन कापण्यात आल्याचा आरोप आमदार वडेट्टीवार यांनी केला. भारनियमनाचा फटका संपूर्ण विदर्भाला बसत असून विवंचनेत असलेला शेतकरी हवालदिल झाला असल्याचे ते म्हणाले.  

शेतकऱ्यांची होळी झाल्यावर संपणार जाहिरात
शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही. मात्र, दुसरीकडे जाहिरातीवर मोठी उधळण करण्यात येत आहे. दिवाळी संपल्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीची जाहिरात सुरू आहे. त्यांची ही जाहिरात होळीपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांची होळी झाल्याशिवाय ती बंद होणार का, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Web Title: nagpur news bjp Vijay wadettiwar