बोधिवृक्ष विहारात सजली मोफत खानावळ

शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूर - बुद्धविहारे धम्माची उपासना केंद्रे आहेत. परंतु, उपराजधानीतील बोधिवृक्ष बुद्धविहार याला अपवाद आहे. अपघातामध्ये जखमी व्यक्ती असो की चिमुकल्यांवर संस्कार करण्यासोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य विहारातून सुरू आहे. नुकताच लोहमार्ग पोलिस परीक्षेसाठी राज्यभरातून आलेल्या शेकडो भावी पोलिसांसाठी मोफत खानावळीसह निवासाची सोय करून बोधिवृक्ष बुद्धविहारात अनोख्या सेवेचा धम्म रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

उपराजधानीतील पोलिस मुख्यालयाच्या पटांगणात २१ ते २८ मार्चपर्यंत शारीरिक चाचणी परीक्षा झाली. परीक्षेसाठी भुसावळ, वाशीम, बुलडाणा, सोलापूरपासून, तर अमरावती, गडचिरोलीसह राज्यातून अडीचशेवर उमेदवार आले. येथे ना जेवणाची ना निवाऱ्याची सोय. हे दृश्‍य येथूनच जात असताना भदन्त हर्षदीप व भदन्त अभय यांना दिसले. तत्काळ बुद्धविहारात सेवाधम्म निभावणाऱ्या मानवाधिकार संरक्षण मंचाचे कार्यकर्ते नीरज रंगारी, अम्लेश चवरे, जयंत भगत, संदीप वाघमारे, आशीष चवरे, मंगेश डोंगरे यांच्याशी सल्लामसलत केली. दोनशे ते अडीचशे मुलांच्या दोन वेळेच्या जेवणाची तसेच निवासाची सोय करण्याचा संकल्प केला. त्याच दिवशी सायंकाळी साऱ्या उमेदवारांना विहारात जेवणाची सोय असल्याचा निरोप दिला व उमेदवार विहारात विसावले. त्यांच्या जेवणाची आणि निवासाची सोय झाली.

हे बुद्धविहार अभ्यासाचे केंद्र बनले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यापासून, तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम विहारात होते. येथे परीक्षेला आलेले मुले गरीब घरातील. जेवणाचा व राहण्याचा प्रश्‍न होता. यामुळे त्यांची सोय केली. तरुण कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळते. यामुळेच सेवाधम्म निभावता येतो.
- भन्ते हर्षदीप, कुंजीलालपेठ, नागपूर.

बुद्धविहारातून धम्माच्या शिकवणीसोबतच बालमनावर संस्कार केले जातात. बालक हा उद्याच्या राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. हा आधारस्तंभ वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी बुद्धविहार हे संस्कार तसेच सामाजिक शिकवणीचे केंद्र तयार करावे.
- भदन्त अभय नायक, नागपूर.

मिळालेल्या दानातून भूक भागवली
विहाराला समाजाकडून मिळालेल्या दानातून भोजनदान करण्याचे कर्म भदन्त हर्षदीप व भदन्त अभय यांच्यासह मानवाधिकार संरक्षण मंचाच्या कार्यकर्त्यांनी केले. आठ दिवस साऱ्या भावी पोलिसांनी येथे मोफत जेवण केले व बुद्धविहारातच निवारा घेतला. बोधिवृक्ष बुद्धविहारात शिक्षणासह लायब्ररी तयार केली आहे. विहारात दानावर जगणारे भन्ते अनाथ मुलांना पुस्तकांचे दान देतात. सहा वर्षांपासून सात्त्विक विचारांतून मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचा व संस्काराचा सेवाधम्म सुरू आहे.

Web Title: nagpur news Bodhivruksha BuddhaVihar